पुणे- रंजन आणि प्रबोधन यांची सांगड घालून 'स्त्री भ्रूणहत्ये'संदर्भात सकारात्मक सामाजिक संदेश देणारी 'सावित्रीच्या लेकी' ही मालिका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर जूनपासून सुरू होणार आहे. सोमवार मंगळवारी सायंकाळी 4.30, बुधवार गुरुवारी दुपारी 12.30 वाजता आणि शनिवार रविवारी रात्री 10 वाजता या मालिकेचे पुनर्प्रसारण केले जाईल.
दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी येथे ही माहिती दिली. कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'सेव्ह बेबी गर्ल' या कथासंग्रहावर ही मालिका आधारली आहे. पटकथा-संवादही त्यांनीच लिहिले आहेत. दिग्दर्शन विद्यासागर अध्यापक यांचे आहे.
डॉ. शरद भुताडिया, अदिती सारंगधर, स्मिता ओक आदींच्या भूमिका मालिकेत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लिंगनिदान करून स्त्री गर्भ पाडण्याच्या पद्धतीमुळे देशात मुलींचे प्रमाण घसरत आहे. पंतप्रधान मोदी यांनीही 'बेटी बचाव बेटी पढाव' असा संदेश दिला आहे.