आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षात पुन्हा सवाई महोत्सवाची उत्साही सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांनी सादर केलेला, प्रसन्न सुरावटींनी सजलेला दुर्गा आणि पुरबयन चटर्जी यांनी सतारीवर छेडलेल्या पटदीपच्या सुरांनी नववर्षच्या पहिल्याच दिवशी ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’ला नव्या उत्साहाने प्रारंभ झाला. यापूर्वी आयोजित केलेला हा महोत्सव अवकाळी पावसामुळे पुढे ढकलावा लागला होता.

नव्या वेळापत्रकानुसार गुरुवारपासून सुरू झालेला हा महाेत्सव आता ४ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. गुरुवारपासून या उत्सवात पुन्हा रंग भरले. पं. निखिल बॅनर्जी आणि पं. पार्थप्रतिम चटर्जी यांच्याकडून गायन आणि वादनाची तालीम घेतलेल्या पुरबयन चटर्जी यांनी राग पटदीप छेडला. शांत आलापी, रंगतदार ‘जोड’ आणि द्रुत लयीतील ‘झाला’ यांतून त्यांनी पटदीपचे वातावरण निर्माण केले. त्यानंतर राग भटियालीमधील धून त्यांनी सादर केली. रामदास पळसुले यांनी त्यांना तबल्याची साथ केली. आनंद भाटे यांनी विलंबित एकतालातल्या ‘तुम रस कान्ह रे’ या रचनेतून राग दुर्गा मांडला. दमदार आलापी, आक्रमक तानांनी त्यांचे गायन सजले होते. ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ या अभंगातून राग जोगियाची दाखवलेली झलक श्रवणीय होती.

बासरीवादनाने सांगता
सवाई गंधर्व यांच्या नातसून पद्मा देशपांडे यांनी राग मारुबिहाग आणि राग सुधा केदार (यमन आणि केदार यांचे मिश्रण) सादर केले. पहिल्या सत्राची सांगता पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीवादनाने झाली. त्यांनी राग झिंझोटी सादर केला. विजय घाटे यांनी तबल्यावर साथ केली.