आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चापेकरांच्या नृत्याने ‘सवाई’ प्रेक्षणीय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भरतनाट्यम या दाक्षिणात्य नृत्यशैलीला उत्तर हिंदुस्तानी संगीताची जोड देऊन सादर केलेल्या ‘नृत्यगंगा’ या देखण्या नृत्याविष्काराने शुक्रवारी ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’चे दुसरे सत्र प्रेक्षणीय बनले. ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगना नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे चापेकर आणि त्यांच्या शिष्यांनी ही ‘नृत्यगंगा’ पेश केली. ‘सवाई’च्या दुसर्‍या सत्रात धनंजय हेगडे यांनी राग ‘मुलतानी’मधून सुरेल वातावरणनिर्मिती केली. धनंजय यांना किराणाप्रमाणेच ग्वाल्हेर घराण्याची तालीमही मिळाल्याचे संकेत त्यांच्या गायनातून स्पष्ट जाणवत होते. पारंपरिक रचनांची त्यांनी अप्रतिम मांडणी करत मुलतानी रंगवला. त्यानंतर ‘गावती’ रागातील बंदिशींचा आनंद देऊन त्यांनी कन्नड भक्तिरचनेने सांगता केली. सुमित्रा गुहा यांनी प्रथम पूरियाधनाश्री आणि त्यानंतर राग यमनमधील बंदिशी सादर केल्या.

वेधक नृत्याविष्कार
डॉ.सुचेता भिडे यांनी नमनानंतर वसंतराव देशपांडे यांच्या ‘सुन सखी पियू मेरो कहां’ या बंदिशीवर नृत्यगंगा या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेवर नृत्यप्रस्तुती केली. यशोदा बाळकृष्णाला झोपवताना रामकथा सांगते, असा प्रसंग त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू दर्शवून गेला. नर्तकाची कसोटी पाहणारी आचार्य रातंजनकर यांची ‘रागतालमालिका’ विशेष दाद मिळवून गेली. सहा राग आणि सहा ताल यांचा या रचनेत समावेश होता. शुद्ध नर्तन अभिनय यांचा समन्वय साधणार्‍या मंगलश्लोकाने त्यांनी नृत्याची सांगता केली. ‘सवाई’च्या दुसर्‍या सत्राची सांगता पं. अजय पोहनकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग ‘दरबारी कानडा’ सादर केला.