आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभा अत्रेंच्या ‘चारूकेशी’ने ‘सवाई’ची सुरेल सांगता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांचे अनुभवसंपन्न गायन, पूर्वार्धात युवा वादक अंबुमणी सुब्रमण्यम याचे अत्यंत ‘तयारी’चे वादन तसेच डाॅ. प्रभा अत्रे यांच्या गायनाच्या स्मृती जपत ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’च्या ६२ व्या सत्राची रविवारी सुरेल सांगता झाली. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने महाेत्सवाचे अखेरचे सत्र रंगले. ‘सवाई’च्या अखेरच्या सत्राची सुरुवात युवा व्हायोलिनवादक अंबुमणीच्या वादनाने झाली. ज्येष्ठ व्हायोलिनवादक ए. सुब्रमण्यम यांचे सुपुत्र असणाऱ्या अंबुमणीने कलेचा हा वारसा समर्थपणे पेलत दाक्षिणात्य संगीत परंपरेतील राग स्वराली, राग धर्मावती यांचे सादरीकरण केले. व्हायोलिन या मूळ पाश्चात्त्य वाद्यातून संपूर्णपणे भारतीय अभिजात संगीताची मांडणी करताना ‘बो’वरील प्रभुत्व, लय-तालांशी चाललेली सहजसुंदर क्रीडा दाद मिळवून गेली.
ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका मीता पंडित यांनी राग पुरियाधनश्री मांडला. काफी टप्पा तसेच ‘शाम भई बिन श्याम’ ही आर्त रचनाही त्यांनी परिणामकारतेने सादर केली. उस्ताद मुबारक अली खाँ यांनी मुलतानी रागाने प्रारंभ केला. किराणा घराण्याचे वैशिष्ट्य त्यांच्या गायनातून प्रत्ययास आले.
पं. उल्हास कशाळकर यांनी समयोचित असा ‘हमीर’ हा उत्तररंगप्रधान राग मांडणीसाठी निवडला. मोजक्या आलापांतून रागस्वरूप मांडून त्यांनी मध्यलय झुमरा तालात हमीरचा विस्तार केला. ‘चमेली फुली चम्पा’, त्याला जोडून ‘तेंडे रे मेंडे रे यार आली’ ही ढंगदार रचनाही त्यांनी पेश केली. त्यानंतर तराणा दाद घेऊन गेला. रसिकांच्या आग्रहाखातर पं. कशाळकर यांनी राग बसंतमधील ‘फगवा ब्रिज देखन को चलो री’ ही प्रसिद्ध बंदिश सादर केली. त्यांना पं. सुरेश तळवलकर (तबला) आणि डॉ. अरविंद थत्ते (हार्मोनियम) यांनी अप्रतिम साथ केली. ‘सवाई’ची सांगता करण्यासाठी ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी सादर केलेला अप्रतिम चारुकेशीने मैफल संस्मरणीय ठरली. त्यानंतर प्रथेप्रमाणे सवाई गंधर्वांच्या ध्वनिमुद्रिकेने हा स्वरसोहळा विसावला.
सवाई गंधर्व संगीत महोत्सवात अंबुमणी सुब्रमण्यम यांचे व्हायोलिनवादन झाले. उस्ताद मुबारक अली खान ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका मीता पंडित यांच्या गायनाने बहार आणली.