आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सवाई’चे तिसरे सत्र नव्या कलाकारांनी गाजवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या स्वरमंचावर यंदा प्रथमच आपली कला सादर करणा-या कलावंतांनी आपल्या आश्वासक सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. हरीश तिवारी, इंद्राणी मुखर्जी, आर. कुमरेश आणि प्रवीण गोडखिंडी या सर्व कलावंतांनी घराण्याच्या कलापरंपरेची धुरा आपल्या खांद्यावर पेलली असल्याचे सुखद दृश्य यानिमित्ताने दिसले.
‘सवाई’च्या तिस-या सत्राचा प्रारंभ हरीश तिवारी यांच्या गायनाने झाला. पं. भीमसेनजींचे मार्गदर्शन तिवारी यांना लाभले असल्याचे त्यांच्या प्रारंभीच्या दमदार स्वरलगावातूनच जाणवले. त्यांनी किराणा घराण्याचा खास राग मुलतानी सादर केला. ‘गोकुल गांव का छोरा’ ही पारंपरिक रचना आणि त्याला जोडून ‘कंगन मुंदरिया मोरी’ हा जोड त्यांनी पेश केला. गंभीर, दमदार, उत्तम दमसास असणारी तिवारी यांची गायकी त्यानंतरच्या मिश्र खमाजमधील ठुमरीतूनही जाणवली. ‘रघुवर तुमको मोरी लाज’ या तुलसीदासांच्या रचनेने त्यांनी सांगता केली. विनोद लेले, अविनाश दिघे यांनी त्यांना साथ केली.
कोलकात्याच्या गायिका इंद्राणी मुखर्जी यांनी यमन सादर केला. ‘नैया पार करो’ या रचनेतून यमनचे सौंदर्य मुखर्जी यांनी उलगडत नेले. ‘गणपती गजानन देव’ ही जोड आणि ‘आओरी गाओरी बजाओरी’ ही द्रुत त्यांनी अतिशय रंगतदारपणे सादर केली. सुरांचा आनंद स्वत: घेत आणि रसिकांनाही देत मुखर्जी यांनी मांडलेला यमन रसिकांची भरभरून दाद मिळवणारा ठरला. रसिकाग्रहास्तव त्यांना खमाजमधील दादरा (हमसे ना बोलो) आणि ‘हमे ना भावे यारी रे’ ही उपशास्त्रीय रचना सादर करावी लागली. त्यांना रामदास पळसुले (तबला) आणि मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम)
यांनी साथ केली.