आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सावरपाडा एक्सप्रेस’ कविता राऊतचा खडतर प्रवास यंदापासून पाचवीच्या अभ्यासक्रमात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत तथा ‘सावरपाडा एक्सप्रेस’ हिच्या खडतर वाटचालीचा प्रवास मांडणारा प्रेरणादायी पाठ (लेख) यंदा बालभारतीच्या इयत्ता पाचवीच्या नवीन अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. प्रतिकूलतेवर मात करीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेवर मोहोर उमटविणाऱ्या कविता राऊत हिच्या संघर्षमय प्रवासावरील हा धडा आता राज्यातील सुमारे 50 लाख विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात ‘बालभारती’ने सन् 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून या पाठाचा समावेश अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ‘यशवार्ता’ या मासिकात मासिकाचे कार्यकारी संपादक संतोष साबळे यांनी हा लेख लिहीला होता. कविता राऊत ही सध्या मुक्त विद्यापीठातून पदवी शिक्षण घेत आहे. मुक्त विद्यापीठाच्या ‘यशोगाथा’ या पुस्तकातून निवडण्यात आलेल्या या पाठामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ परिवाराकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आणि राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा 2005 नुसार बालभारतीने प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. या शासनमान्य अभ्यासक्रमावर आधारीत इयत्ता पाचवीचे मराठी बालभारती हे पुस्तक तयार करण्यात आले. मराठी भाषा समितीचे ज्येष्ठ सदस्य इरगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या पुस्तकात नामवंत लेखक यदुनाथ थत्ते, डॉ. अनिल गोडबोले, डॉ. सरोजिनी बाबर, द. मा. मिराजदार, कवयित्री बहिणाबाई चौधरी या मान्यवरांच्या पाठ अन् कवितांचाही समावेश आहे. संतोष साबळे यांनी विविध वृत्तपत्रे आणि प्रादेशिक टीव्ही न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून दीर्घकाळ पत्रकारिता केली आहे. ते साहित्य,कला, संस्कृती, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दीर्घकाळापासून कार्यरत आहेत. सध्या विद्यापीठाच्या यशवार्ता मासिकाचे संपादक आणि मुक्त विद्यापीठ संवाद पत्रिकेचे सहसंपादक म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी आहे.
राष्ट्रकुल आण‌ि आश‌ियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा न‌िर्माण करीत म्हणून देशाचे नाव उंचावणाऱ्या कव‌िताची आजवरची वाटचाल, मिळालेले यश हे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वेगळी दिशा आणि बळ देणारी आहे. तिच्या कामगिरीची प्रेरणा इतरांना मिळावी म्हणूनच लिहायचे ठरवले होते. विद्यापीठाने संधी दिल्याने ‘यशोगाथा’ पुस्तकाची निर्मिती करता आली. आता हा धडा संपूर्ण महाराष्ट्रात शिकविण्यात येणार असल्याने आनंद वाटतोय, असे पत्रकार-लेखक संतोष साबळे यांनी म्हटले आहे.
प्रतिकूलतेवर मात करत प्रेरणा देणाऱ्या कविता राऊत या विद्यापीठातील विद्यार्थीनीच्या तसेच व आंतरराष्ट्रीय धावपटूच्या प्रवासाची दखल संतोष साबळे यांनी ‘यशोगाथा’ पुस्तकाच्या माध्यमातून सुरूवातीस घेतली. विद्यापीठ सेवेत काम करताना विधायक दृष्टीकोन त्यांनी बाळगल्याने आता बालभारतीच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना हा धडा प्रेरणा देईल. विद्यापीठासाठी ही अभिमानास्पद बाब आहे, असे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण, आदिवासी आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात गुणवंत खेळाडू आहेत. असे खेळाडू शोधून त्यांना योग्य प्रशिक्षण आणि प्रशिक्षक मिळाल्यास भारताला चांगले अ‍ॅथेलेटिक्स मिळू शकतील. सावरपाड्याचे नाव देशभर झाले असले तरी माझ्या जीवन प्रवासावरील धड्याचा बालभारतीने अभ्यासक्रमात समावेश केल्याने खूप आनंद झालाय. राज्यातील मुलींनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्राकडे वळायला हवे असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिने दिली आहे.
पुढे छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा, कविता राऊतचा खडतर प्रवास बालभरतीत कसा शब्दबद्ध झाला आहे....
बातम्या आणखी आहेत...