आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पकार करमरकरांच्या शिल्पकृतींचा अनमोल ठेवा संकटात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - विख्यात शिल्पकार विनायक करमरकर यांचे दुर्मिळ शिल्पवैभव सरकारी अनास्थेच्या भोवर्‍यात सापडले असून, हा अमोल ठेवा करमरकर कुटुंबीयांनाच सांभाळावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक शिल्पांना क्षती पोहोचल्याने या शिल्पकृती त्वरित जतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
भारतीय शिल्पकारांमध्ये ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, अशा मोजक्या शिल्पकारांपैकी एक नाव म्हणजे विनायक करमरकर. अनेकानेक उत्कृष्ट शिल्पकृती घडवणार्‍या करमरकरांचे 1967 मध्ये निधन झाले. त्यानंतर लष्करी सेवेत असलेले त्यांचे पुत्र आणि सून सुनंदाताई यांनी हा शिल्पठेवा घरातच संग्रहालय उभारून जतन केला. तेव्हापासून आजपर्यंत सुनंदाताईच या शिल्पांची काळजी घेत आहेत. सुनंदाताईंचे वयही आता 80 च्या घरात आहे. करमरकरांचे नातू विदेशात असल्यामुळे त्यांचे हे शिल्पवैभव सरकारी पातळीवर जतन करण्याची आवश्यकता आहे.
रायगडच्या अलिबाग तालुक्यातील सासवणे गावात शिल्पकार करमरकरांची ही शिल्पे सध्या जतन केली आहेत. शिल्पांचे जतन करण्याची शास्त्रीय पद्धती या गावात उपलब्ध नाही. तसेच त्यासाठी आवश्यक अधिक जागाही येथे नाही. सुनंदाताईंच्या एका डोळ्यात दोष निर्माण झाल्याने शिल्पांची काळजी, देखभाल यासाठी त्या करत असलेल्या प्रयत्नांवर र्मयादा आल्या आहेत. अस्सलता, जिवंतपणा हे करमरकरांच्या शिल्पांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यांचा हा समृद्ध वारसा मूळ स्वरूपात जतन करणे व त्यांची योग्य देखभाल करणे हे शासनाप्रमाणेच कलाप्रेमींचेही कर्तव्य आहे.