आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंपाच्या शोधात, पृथ्वीच्या पोटात - जमिनीत ८ किलोमीटर खोलीचे छिद्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भूकंप का होतो, त्याचा अंदाज वर्तवता येईल का, तीव्रता अगोदरच कळू शकेल का, या प्रश्नांची उकल झाल्यास भूकंपामुळे होणारी प्रचंड जीवित आणि वित्तहानी टाळण्यास किंवा कमी करण्यास मदत होऊ शकते. म्हणूनच भूकंपाचा वेध घेण्याचा प्रयत्न कोयना-वारणा परिसरात (जि. सातारा) संशोधक करत आहेत. कराडजवळ (जि. सातारा) हजारमाची येथे राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेने भूकंप शोधाचे काम हाती घेतले आहे. भूकंपाच्या नेमक्या कारणांचा वेध घेण्यासाठी भूकंप केंद्रस्थानाच्या शक्य तितक्या जवळ जाण्याचा भारतातील हा पहिलाच प्रयत्न आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात कोयना-वारणा खोऱ्यात तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर खोलीच्या दोन विहिरी (बोअरहोल) घेतल्या जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात
विहिरीची खोली आठ किलोमीटरपर्यंत वाढवण्यात येईल.

कोयना-वारणाचा परिसर वेस्टर्न घाट (पश्चिम घाट)चा भाग आहे. या ठिकाणचा भूभाग अत्यंत कणखर अशा बेसॉल्ट खडकाने आणि ग्रॅनाइटने बनला आहे. या परिसरात घेतल्या जाणाऱ्या दोन विहिरींच्या माध्यमातून पृथ्वीच्या पोटातील हालचाली टिपण्याचे काम होणार आहे. भूकंप
शास्त्रज्ञांचा समूह या परिसरात विविध निरीक्षणे घेणार आहे. या तपशिलाचे विश्लेषण हजारमाची (ता. कराड, जि. सातारा) येथे उभारल्या जाणाऱ्या प्रयोगशाळेत होणार आहे. याच प्रयोगशाळेतून संशोधनावर पूर्ण नियंत्रण ठेवले जाईल. हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेतील वरिष्ठ भूकंपशास्त्रज्ञांनी सांगितले, जमिनीखाली घडणाऱ्या घडामोडी लक्षात आल्यास भूकंपाचा अंदाज वर्तवणे शक्य होऊ शकते. या दृष्टीने प्रथमच या पद्धतीचा प्रयोग भारतात होत आहे. भूगर्भात छिद्रे घेण्याची ठिकाणे आणि आवश्यक उपकरणांच्या निवडीबद्दलचा अभ्यास पूर्ण झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. छिद्र घेण्याचे काम दीर्घकाळ चालणार असल्याने प्रत्यक्ष संशोधनास लगेच सुरुवात होणार नाही.

प्रकल्पाची वाटचाल
पृथ्वीविज्ञान मंत्रालयाने २०१२ मध्ये प्रकल्पाची आखणी केली. २०१३ मध्ये कोयना परिसरात संशोधनास मान्यता दिली व ४७२ कोटी मंजूर करण्यात आले. १०५ एकर जमीन यासाठी दिली जाईल. पावसाळ्यानंतर खोऱ्याच्या भूगर्भात ५ किलोमीटर खोलीचे छिद्र घेण्याचे काम सुरू होईल.यातून उपकरणे पाठवून भूकंपाच्या नोंदी घेतल्या जातील.

कोयनाच का ?
महाराष्ट्राचा बहुतांश भाग तीव्र भूकंपाची शक्यता नसलेला आहे. मात्र कराड, सातारा व सह्याद्री डोंगररांगांतील काही भाग "झोन ४' म्हणजेच तीव्र भूकंपाच्या शक्यतेचा मानला जातो. राज्याच्या ज्ञात इतिहासातील सर्वात मोठा भूकंप कोयना परिसरात सन १९६७ मध्ये ६.५ रिश्टर स्केल इतका नोंदला गेला. या परिसरात सातत्याने कमी तीव्रतेचे भूकंप होत असतात. त्यामुळे संशोधक कोयना-वारणा परिसर "नॅचरल लॅब' मानतात. भूकंपप्रवण क्षेत्र व प. घाटाचा कणखर भूगर्भ यामुळे कोयना परिसर निवडण्यात आला आहे.