पुणे - प्रत्येकाच्या आयुष्यात विवाह ही महत्त्वपूर्ण घटना असते. आपल्या जोडीदाराच्या साथीने तो नव्या जीवनाची सुरुवात करून आयुष्यभर साथ देण्याची वचने देत असतात. मात्र काही जोडीदार आपल्या जीवनसाथीला अर्ध्या प्रवासात सोडून निघून जातात. उतारवयात एकट्याने आयुष्य कंठणे ही एक शिक्षाच असते. त्यामुळे अशा स्थितीत काही जण दुसर्या लग्नाचा आधार घेतात. मात्र गेल्या काही दिवसांत अशा ‘सेकंड इनिंग’च्याच अनेक तक्रारींचा ओघ गुन्हे शाखेच्या महिला साहाय्य कक्षाकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यातील एका 75 वर्षीय ज्येष्ठाने 52 वर्षीय महिलेशी तिसरा विवाह केला. मात्र, गृहिणी म्हणून जबाबदारी पेलण्यास पत्नी असमर्थ असल्याचे सांगत अवघ्या 16 महिन्यांत त्यांचा संसार संपुष्टात आला आहे. दुसर्या लग्नाच्या नावाखाली ज्येष्ठांची फसवणूक होत असून केवळ मालमत्तेसाठी हा खटाटोप केला जात असल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत.
अनिल शेटे (नाव बदलले आहे) हे निवृत्त प्राध्यापक असून त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले झाली, परंतु कौटुंबिक वादातून त्यांचा काडीमोड झाला. त्यांचा एक मुलगा आज अमेरिकेत तर दुसरा जर्मनीत आहे. मात्र, त्यांनी आपल्या पित्याशी कोणताही संबंध ठेवलेला नाही. शेटे यांनी दुसरे लग्न केले, परंतु थोड्याच कालावधीत डायबिटीसची रुग्ण असलेल्या पत्नीचे निधन झाले. उतारवयात एकटेपणा जाणवू लागल्याने व म्हातारपणी कोणाचा तरी आधार असावा या उद्देशाने त्यांनी तिसरे लग्न करायचे ठरवले. त्यासाठी एका वृत्तपत्रात जाहिरातही दिली. या माध्यमातून ज्योती कदम (वय 52, नाव बदलले आहे) हे स्थळ आले. त्यांचा हा पहिलाच विवाह होता. आजवर परदेशातील नवरा हवा, या हट्टापायी त्यांचा विवाह लांबला होता. अखेर तिने शेटे यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शेटे यांची आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी त्यांना मागेपुढे कुणीच नव्हते. संसार सुरू होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच या दोघांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या. दिवसेंदिवस वाद वाढतच होता. अखेर हे प्रकरण महिला साहाय्य कक्षापर्यंत येऊन पोहोचले.
घर, पेन्शनची काळजी घ्या
महिला साहाय्य कक्षाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता जाधव म्हणाल्या, सदर प्रकरणात दोघांचे तीन वेळा समुपदेशन केले आहे. आता एकत्र यायचे की विभक्त व्हायचे हा निर्णय त्या दोघांवरच अवलंबून आहे. ज्येष्ठ नागरिकांनी पुनर्विवाह करताना जागरूक राहणे गरजेचे आहे. यात दोघेही शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्टेबल झालेले असतात. पुनर्विवाह करण्यापूर्वी स्वत:चे घर, पेन्शनवरील हक्क अबाधित राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे.