पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2014 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात कोणतीही घाई किंवा गोंधळ नसल्याचा खुलासा मंडळातर्फे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केला आहे. काही विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवलेले असले, तरी त्यामागे विविध कारणे आहेत. त्यांचे निराकरण झाल्यावर हे निकाल जाहीर केले जातील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
दहावीचा निकाल 17 जून रोजी राज्य शिक्षण मंडळाने संकेतस्थळावर जाहीर केला. काही विद्यार्थ्यांचे निकाल मंडळाने राखून ठेवल्याचे स्पष्ट होताच मंडळाने घाईघाईने निकाल जाहीर केल्याने गोंधळ झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पालकांच्या दबावामुळे ही घाई झाल्याचेही त्यात म्हटले होते. शिक्षण मंडळाने मात्र त्याचे खंडन केले आहे.
‘दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी कोणतीही घाई मंडळावर करण्यात आलेली नाही. शालेय शिक्षणमंत्र्यांनी मंडळाशी विचारविनिमय करूनच निकालाची तारीख जाहीर केली. काही विद्यार्थ्यांचे निकाल मंडळाने राखून ठेवले आहेत. त्यासाठी विविध वैध कारणे आहेत. याबाबत आवश्यक ती खातरजमा करून या विद्यार्थ्यांचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील. इतर विद्यार्थ्यांसोबतच या विद्यार्थ्यांनाही गुणपत्रिका देण्याची व्यवस्था करण्यात येईल,’ असे पाटील यांनी सांगितले.
गैरप्रकारांत नागपूर अव्वल
नागपूर विभाग 179 प्रकरणे
पुणे 162
नाशिक 142
अमरावती 118
कोल्हापूर 67
औरंगाबाद 38
मुंबई 23
लातूर 22
कोकण 06
० शाळांकडून अंतर्गत गुण वेळेवर व अचूक प्राप्त न होणे
० विषयांच्या श्रेणी न मिळणे
० प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण विलंबाने कळणे
० नवीन अभ्यासक्रम अनिवार्य असताना जुन्या अभ्यासक्रमाची परीक्षा देणे
० जुना अभ्यासक्रम असताना नव्याच अभ्यासक्रमाची परीक्षा देणे
० ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलणे
० विषय वा माध्यम परस्पर बदलणे
पालकांशी चर्चा करणार
गैरव्यवहारांत सापडलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली. राज्यात एकूण 757 गैरप्रकार झाल्याची नोंद आहे. अमरावती विभागात मास कॉपीची चर्चा होती. गैरव्यवहारांत अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून, शिक्षक - पालकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. या प्रकरणांतील निकाल नंतर जाहीर केले जातील. मात्र ते नक्की कधी जाहीर होतील, हे आता सांगता येणार नाही, असे म्हमाणे म्हणाले.