ज्ञानाेबा-तुकाेबा नगरी - ‘बरेचदा अापण दर्शनी बाजूचा विचार करताे. अात शिरून विचार केला तर लक्षात येते की, निर्णय प्रकियेत अद्यापही महिलेची प्रतिमा अस्पष्टच अाहे. जाेपर्यंत प्रक्रियेत हवं तसं काम करता येणार नाही ताेपर्यंत तिला पूर्ण स्वातंत्र्य नाही,’ असा निष्कर्ष संमेलनातील ‘माध्यमातील स्त्री-प्रतिमा अाणि भारतीय संस्कृती’ या विषयावरील परिसंवादात अध्यक्षा ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी काढला. त्यांच्यासह पत्रकार सरिता काैशिक, प्रा. गुरैया स्वामी, निर्माती जयू भाटकर, लेखिका अमृता माेरे व डाॅ. अनिरुद्ध माेरे यांनी मते मांडली.
माध्यमांनी स्त्रीला वस्तू केले
रजनी, उडान मालिका प्रकर्षाने अाठवतात. तसे अाता का हाेत नाही असा प्रश्न पडताे. मालिकांमध्ये एक तर खलनायक स्त्री दाखवतात किंवा अत्यंत लाेभ, ग्लॅमर असलेली. त्याउलट दाखवूनही तिला केंद्रबिंदू केला जाताे. म्हणजे वस्तूच केलं जातं. जाहिरातीत तर ती पूर्णत: वस्तूच असते. मनाेरंजनातील स्त्री संस्कृतीनुसार अाहे. कला, रूढी, दृष्टिकाेन, परंपरा यात ती बसते का? हा विचार अाता माध्यमातून हाेत नाही, अशी खंत काैशिक यांनी व्यक्त केली.
स्त्री माणूस नाही
अापली संस्कृती अापल्यालाच जपता अालेली नाही. वैदिक काळात स्त्रीपुरुष एक हाेते. उपनिषदातही थाेड्याफार फरकाने तेच हाेते. पण कर्मसिद्धांताने स्त्रीचा माणूस म्हणून स्वीकार केलाच नाही. देवपूजेचा अधिकार तिला दिलाच नाही. जाती-धर्माच्या भिंती उभ्या केल्या. स्त्रीला देवता मानलं गेलं. चांगला पती मिळावा म्हणून स्त्री व्रत करते; पण चांगली पत्नी मिळावी म्हणून पुरुष कधी व्रत करत नाही, याकडे प्रा. स्वामी यांनी
लक्ष वेधले.
उगीच माेठं करताेय का?
अापण स्त्रीला उगीच माेठं करताेय का? तिच्याकडे काेणत्या दृष्टीने बघताे हे अाधी ठरवलं पाहिजे. टीव्ही, जाहिरात व सिनेमात दाखवली जाणारी स्त्री ही भारतीय संस्कृतीला खूप धरून असल्याचं मला तरी जाणवतं. मालिकेतील जान्हवी अावडते, स्वानंदी अावडते. अापल्या लेकीबाळी तशा असाव्या असे वाटते. त्या उगीच दाखवत नाहीत. मुळातच डेली साेप हा प्रकार बायकांसाठी अाहे. ती चाैकट माध्यमांना माेडता येणार नाही, असे अमृता माेरे म्हणाल्या.
माध्यमांकडून प्रतिमा मलिन
सन १९९० नंतर जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले अाणि स्त्री ही माध्यमांमधून वस्तू म्हणून विकली गेली. या गाेष्टीला अापण चारचाैघात विराेध करत असलाे तरी मनातून अापल्याला तीचं ते रूप अावडतच असतं ही पुरुषी मानसिकता अाहे. हीच मानसिकता माध्यमांनी कॅच केली अाणि स्त्री प्रतिमा मलिन केली, असे डाॅ. अनिरुद्ध माेरे (अाैरंगाबाद) म्हणाले.