आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात ‘सोन्याचा धूर निघायचा’ याचे पुरावे कुठेच नाहीत- ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. ढवळीकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘एके काळी देशात सोन्याचा धूर निघत असल्याचे म्हटले जाते. मात्र त्याबाबतचे सबळ पुरावे नसल्याचे परखड मत कै. न. चिं. केळकरांनी मांडले होते. चंद्रगुप्त मौर्याने सोन्याची नाणी काढली, अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मात्र त्याबाबतचे सबळ पुरावे उत्खननातून का मिळत नाहीत?’ असे परखड मत ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ-लेखक आणि डेक्कन महाविद्यालयाचे निवृत्त संचालक डॉ. मधुकर ढवळीकर यांनी व्यक्त केले.
 
इतिहासाचे उदात्तीकरण सुरू असून यातून पुनर्लेखनाचाही विषय पुढे येतो आहे. यात खोटा इतिहास लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्याला खरा इतिहास हवा आहे. खोट्या इतिहासाची आत्मप्रौढी नको, असेही त्यांनी बजावले.   

साहित्यसम्राट कै. न. चिं. केळकर यांच्या सत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी डॉ. ढवळीकर यांच्या ‘महाराष्ट्राची कुळकथा’ या ग्रंथाला केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिकाने गौरवण्यात आले. डॉ. ढवळीकर म्हणाले, ‘केळकर यांनी ‘मराठा आणि इंग्रज’ हा उत्कृष्ट ग्रंथ लिहिला. त्यात पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव का झाला, इंग्रजांचे चांगले गुण कोणते आदींबाबत त्यांनी विवेचन केले आहे. इतिहासातील बाबी सांगून प्रौढी मिरवण्याच्या एतद्देशीयांच्या सवयीला सबळ पुराव्यांचा आधार नसल्याचेही त्यांनी नोंदवून ठेवले.  
 
‘महाराष्ट्राची कुळकथा’ या पुस्तकातील काही गोष्टी लोकांना रुचणार नाहीत, असे सांगून डॉ. ढवळीकर म्हणाले, ‘इतिहासात पर्यावरण महत्त्वाचे आहे. कारण पर्यावरणाचा परिणाम व प्रभाव इतिहासावर जाणवत असतो. पर्यावरणाशी जुळवून घेण्याची धडपड म्हणजे संस्कृती. फ्रेंचांनी या पर्यावरणाच्या नोंदींसंदर्भात मोठे काम केले आहे.’  

या वेळी सामाजिक कार्यकर्त्या निशा शिऊरकर यांच्या “लढा टाकलेल्या स्त्रियांचा’ या ग्रंथाला केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिकाने गौरविण्यात आले. डॉ. श्रीराम सावरीकर यांनाही वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी कै. रा. वि. वारदेकर पारितोषिकाने गौरविण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...