आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Cartoonist R.K.Laxman's Last Riot Today. Read News At Divyamarathi.com

अार. के. लक्ष्मण यांचे उचित स्मारक उभारु : मुख्यमंत्री फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘व्यंगचित्रकार अार. के. लक्ष्मण हे देशाचे वैभव होते. त्यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी निर्मिलेला ‘कॉमनमॅन’ अजरामर आहे आणि राहील. राज्य शासनाच्या वतीने लक्ष्मण यांच्या कर्तृत्वाला साजेसे यथोचित स्मारक उभारले जाईल’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लक्ष्मण यांना श्रद्धांजली अर्पण केली.
‘लक्ष्मण यांनी रेषांतून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात एक सभ्य पण उपयुक्त अंकुश अर्धशतकाहून अधिक काळ होता. आपली सकाळ हसरी केलीच, पण चुकीच्या गोष्टींकडे कुंचल्याच्या माध्यमातून प्रहारही केला, असेही फडणवीस म्हणाले.
शिक्षणमंत्री विनोद तावडे : ‘त्यांनी सार्वजनिक जीवनात अनेक बाबतीत व्यंगचित्रांची ‘लक्ष्मणरेषा’ दर्शवून दिली. एकाच व्यक्तीने सलग पन्नास वर्षे, बदलत्या समाजजीवनाचा असा वेध घेणे महत्त्वाचे तर आहेच, पण अपवादात्मक आहे.

शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे : ‘कुंचल्याचा अखेरचा सम्राटच लक्ष्मण यांच्या निधनाने हरपला. बाळासाहेब ठाकरे आणि लक्ष्मण यांची कला कारकीर्द एकाच वेळी एकाच ठिकाणी सुरू झाली. त्यामुळे त्यांच्यात आगळे स्नेहबंध होते. ते कायम जपल्याने बाळासाहेबही सवड काढून लक्ष्मण यांना भेटत असत. बाळासाहेब गेले आणि आता लक्ष्मणही नाहीत. त्यांचे ऋणानुबंधांचे स्मरण राहील.

डॉ. शां. ब. मुजुमदार (संस्थापक सिम्बयोसिस) :‘गेल्या ३० वर्षांपासून लक्ष्मण यांच्याशी मैत्री होती. अशाच एका भेटीत कॉमनमॅनच्या पुतळ्याचा विषय निघाला. लक्ष्मण यांनी तो मंजूर केला आणि संस्थेच्या प्रवेशद्वारापाशीच ‘कॉमनमॅन’ उभा राहिला. या पुतळ्याचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते झाले होते.

चित्रकार चारुहास पंडित : ‘भारतीय व्यंगचित्रकलेवर ठसा उमटवणारे लक्ष्मण सर्वार्थाने अस्सल भारतीय होते. चित्रशैलीसाठी त्यांनी डेव्हीड लो यांना आदर्श मानले तरी त्यांची कला त्यापुढे गेलेली दिसते. विषय, मांडणी, वातावरण आणि कॉमेंट हे सारे खास भारतीय आणि लक्ष्मण टच असणारे होते. त्यांचे चित्र आणि त्यावरचे भाष्य, एकजीव असे.