पुणे - इंदूरजवळच्या ‘तंट्या भिल्ला’पासून ते लहानपणीच्या ‘फुलपाखरां’पर्यंतच्या गोष्टी सांगत लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन त्यांच्या पुस्तकप्रेमाबद्दल बोलत गेल्या आणि ‘बुकशेल्फ’च्या प्रकाशन सोहळ्यात एक अनौपचारिक गप्पांची मैफलच रंगली. दैनिक भास्कर समूहाचे नॅशनल पॉलिटिकल एडिटर अभिलाष खांडेकर यांच्या ‘बुकशेल्फ’ या पुस्तकाचे प्रकाशन महाजन यांनी रविवारी पुण्यात केले. या वेळी त्या बोलत होत्या.
खांडेकर यांचे पहिलेच मराठी पुस्तक साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केले. या सोहळ्याला प्रकाशक बाबा भांड, ज्येष्ठ संपादक भानू काळे, लेखक संजय भास्कर जोशी, खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते. खांडेकरांशी असलेले कौटुंबिक संबंध व अभिलाषबद्दलची माया यामुळेच पुस्तक प्रकाशनासाठी मी पुण्यात आले, असे महाजन म्हणाल्या. त्या म्हणाल्या, ‘बुकशेल्फ’मधील इंग्रजी पुस्तकांचे रसग्रहण वाचताना ‘बटरफ्लाइज ऑफ इंडिया’ या पुस्तकाचे रसग्रहण वाचल्यानंतर मला बालपणातील फुलपाखरं आठवली. त्या फुलपाखरांचे रंग आठवले. मी लगेच नातीसाठी मूळ इंग्रजी पुस्तक विकत घेतले. माझी नात इंजिनिअरिंगला शिकत असल्याने साहजिकच ‘पॅकेज’चा विचार तर करणारच. तिच्या आयुष्याच्या पॅकेजमध्येही विविध रंग भरले जावेत, म्हणून पुस्तक भेट दिले.
‘बुकशेल्फ’ वाचल्यानंतर मूळ इंग्रजी पुस्तकाबद्दलची उत्कंठा वाढते, असे काळे म्हणाले. ‘पुस्तकांच्या जंगलात घेऊन जाणारा वाचकांचा वाटाड्या’ या शब्दांत संजय भास्कर जोशी यांनी ‘बुकशेल्फ’चे कौतुक केले. ते म्हणाले, खांडेकरांनी इंग्रजीतल्या उत्तमोत्तम पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. समीक्षा किंवा टीका न करता त्यांनी केलेल्या रसग्रहणामुळे इंग्रजी पुस्तकांबद्दलचे कुतूहल वाढीस लागते. ‘बुकशेल्फ’मधील इंग्रजी लेखकांच्या पुस्तकांचे वैविध्य पाहता हे पुस्तक वाचणारा माणूस ‘इन्स्टंट विद्वान’ होण्याचा धोका असल्याची मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली. या सदराला ‘दिव्य मराठी’च्या वाचकांकडून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता,’ असे खांडेकर यांनी सांगितले. बाबा भांड यांनी प्रास्ताविक केले. ‘दिव्य मराठी’चे सल्लागार संपादक यमाजी मालकर यांनी सूत्रसंचालन केले. साकेत भांड यांनी आभार मानले.
कार्यक्रमाची अधिक छायाचित्रे पाहा पुढील स्लाइडवर