आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ नेते शरद जोशी यांचे निधन, मंगळवारी अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते शरद जोशी यांचे शनिवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. महाराष्ट्राच्या शेतकरी चळवळीमध्ये प्राण फुंकण्याचे काम शरद जोशी यांनी केले होते. त्यांच्या पार्थिवावर पुण्यात मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून अखेरपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा, त्यांना हक्क मिळावा यासाठी विविध आंदोलनांच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना दखल घ्यायला वारंवार भाग पाडले होते. 2004 ते 2010 या कालावधीमध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांची वर्णी लागली. त्या काळातही सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तोंड फोडण्याचे काम ते करत राहिले.
शरद जोशी यांचा अल्प परिचय
शरद जोशी यांचा जन्म ३ सप्टेंबर १९३५ रोजी साताऱ्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अनंतराव जोशी तर आईचे नाव इंदिरा असे होते. त्यांना श्रेया आणि गौरी अशा दोन मुली असून श्रेया कॅनडा तर गौरी अमेरिकेत न्यू जर्सी येथे असते.
शरद जोशी यांचे प्राथमिक शिक्षण बेळगावात तर माध्यमिक शिक्षण मुंबईत विलेपार्ले याठिकाणी झाले. 1955 मध्ये मुंबईतून त्यांनी बी.कॉम ची पदवी मिळवली तर 1957 मध्ये एम कॉम पूर्ण केले. बँकिंग विषयासाठी त्यांना सी रँडी सुवर्णपदकही मिळाले होते. 1958 मध्ये त्यांनी भारतीय टपाल सेवेची परीक्षाही उत्तीर्ण केली होती. एम. कॉम पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॉमर्स कॉलेज, कोल्हापूर येथे अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे व्याख्याता म्हणून काम केले. त्यांनंतर भारतीय टपाल सेवेमध्ये सुमारे दहा वर्षे ते पहिल्या दर्जाचे अधिकारी म्हणून कार्यरत होते.

पण हे सर्व करत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना खुणावू लागले होते. सुरुवातीला त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लिखाण करण्यास सुरुवात केली. विविध वर्तमानपत्रांमधून ते शेतकर्यांच्या समस्यांवर स्तंभलेखन करायचे. पण एवढ्याने भागणार नाही, हे लक्षात आल्याने त्यांनी 1979 मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली. 9 ऑगस्ट रोजी चाकणमध्ये त्यांनी संघटनेचे कामकाज सुरू केले. संघटना सुरू झाल्यापासून ’शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा,उस, तंबाखू, दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेत्वृत्व त्यांनी केले. त्यासाठी त्यांना वारंवार उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने करावी लागली.

संघटनेचे काम राज्यापुरते मर्यादीत न ठेवता देशभरात त्याचा विस्तार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी देशभरातील शेतकर्‍यांच्या अ-राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना केली. महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यात शेतकरी आंदोलने सुरू केली.

1994 मध्ये त्यांनी ’स्वतंत्र भारत पक्षा’ची स्थापनाही केली. देशाची राजकीय,आर्थिक व सामाजिक यंत्रणा पूर्णपणे बदलून टाकण्याची आवश्यकता
मांडणारा व त्यासाठी उपाययोजना सुचविणारा अनोखा, मतदारांना कोणतीही लालूच न दाखविणारा किंबहुना, मतदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा निवडणूक जाहीरनामा त्यांनी निवडणुकीत सादर केला. जुलै २००४ ते जुलै २०१० या काळात स्वतंत्र भारत पक्षाचे सदस्य म्हणून त्यांना राज्यसभेचे खासदार बनवण्यात आले. सरकारच्या विविध समित्यांमध्येही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
(स्त्रोत : http://www.sharadjoshi.in)
पुढील स्लाइड्सवर पाहा, शरद जोशी यांचे काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...