आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहन धारिया कालवश,ग्रामविकासाबद्दल पद्मविभूषणने सन्मानित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी केंद्रीय मंत्री आणि नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. मोहन धारिया (88) यांचे सोमवारी सकाळी पुण्यात निधन झाले. किडनीच्या विकाराने ते आजारी होते. ‘वनराई’च्या माध्यमातून केलेल्या ग्रामविकासाच्या कार्यासाठी धारियांना 2005 मध्ये राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी ‘पद्मविभूषण’ने गौरवले होते.

दोन दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने धारियांना पुना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्तदाब अचानक कमी झाल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावली. ते कृत्रिम श्वासोच्छ्वासावर होते. उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सोमवारी सकाळी 7 .55 च्या सुमारास धारियांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी शशिकला, पुत्र सुशील, रवींद्र आणि कन्या साधना र्शॉफ असा परिवार आहे.

ब्रिटिश राजवटीत स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर लोकशाही टिकवण्यासाठी तुरुंगवास भोगावा लागलेल्या दुर्मिळ देशभक्तांमध्ये डॉ. धारियांचा समावेश होतो. 1960 ते 80 दरम्यान राष्ट्रीय राजकारणात बंडखोर आणि पुरोगामी विचारांमुळे ‘तरुण तुर्क’ म्हणून ते ओळखले जात. माजी पंतप्रधान चंद्रशेखर, कृष्णकांत आणि डॉ. धारिया हे त्रिकूट ‘तरुण तुर्क’ म्हणून ओळखले जात होते. सामाजिक कार्याच्या माध्यमातून राज्यभरातील हजारो कार्यकर्ते त्यांना ‘अण्णा’ या लाडक्या नावाने पुकारत.