पंढरपूर- कार्तिकी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे अडीच लाखांहून अधिक वैष्णव भाविक येथे दाखल झाले आहेत. श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे सात ते आठ तासांपेक्षा अधिक कालावधी लागत आहे. एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे महसूल व कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी आज पहाटे सपत्नीक केली. राज्यात पाऊसपाणी पडू दे, राज्यावरील दुष्काळाचे सावट येऊ देऊ नको, अशी मागणी घालत खडसे विठ्ठलाच्या चरणी लीन झाले. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. विठ्ठला, महाराष्ट्र राज्य हे देशात पुन्हा पहिल्या क्रमांकावर येऊ दे. त्यासाठी तूच आम्हाला बळ दे असे साकडेही त्यांनी घातले. पंढरपूर येथे येणा-या वारक-यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधीव्दारे प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन खडसे यांनी केले.
यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, पंढरपूरच्या तीर्थक्षेत्र विकास योजनाव्दारे येथे येणा-या वारक-यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल तसेच चांगला आराखडा तयार करुन पंढरपूराकडे येणा-या रस्त्याचे रुदींकरण व कॉक्रीटीकरण करणे. शहरावरचा वाढता ताण व वाढती समस्या, चंद्रभागेचे होत असलेले प्रदूषण याबाबत नियोजन करुन येथील पाणी स्वच्छ व निर्मळ रहावे. शहराच्या स्वच्छतेसाठी तसेच शहरातील विविध मठामध्ये शंभर टक्के अनुदानावर शौचालये केली जाणार असल्याचे प्रतिपादन केले. गेल्या कित्येक वर्षाची पंढरपूरच्या पांडूरंगाची शासकीय महापूजा करण्याची अपेक्षा आज पूर्ण होत आहे. हा
आपला जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, असे भावूक उद्दगारही खडसे यांनी काढले.
खडसे म्हणाले, आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे राज्याकडून मोठ्या प्रमाणावर निधीची अपेक्षा करणे योग्य नाही. केंद्राकडून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्रीय ऊर्जा पर्यावरणमंत्री पीयूष गोयल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. त्यांनी पंढरपूरच्या विकासाचा आराखडा पाठवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. चंद्रभागा नदीच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून निधीची उपलब्धता होऊ शकेल असेही खडसे म्हणाले. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द केला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:हून पाठिंब्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. गोहत्या बंदी कायद्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ऊस दरासंदर्भात राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करणार आहोत, असे खडसेंनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले.
खडसेंची रुखरुख कायम, ओबीसी मुख्यमंत्री व्हावा ही राज्यातील बहुजनांची इच्छा- ओबीसी बहुजनांना आपला मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा होती. कारण ओबीसी बहुजनांमुळेच भाजपला बळ मिळाले आहे, असे सांगत राज्याचे महसूल-कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्रिपद हुकल्याची अप्रत्यक्ष खंत व्यक्त केली. तथापि, खडसे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाच्या नेमणुकीच्या वेळी जातीपातीचे राजकारण झाले नाही. मुख्यमंत्रिपद मिळाल्याने नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्तेत सहभागासंबंधी शिवसेनेशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.
मुखदर्शनालाही गर्दी- पदस्पर्शदर्शनाबरोबरच मंदिर समितीने मुखदर्शनाची चांगली व्यवस्था केलेली आहे. अवघ्या 40 फूट अंतरावरून एकाचवेळी साधारण चार ते पाच भाविकांना श्री विठुरायाचे मुखदर्शन घडत आहे. याबरोबरच ऑनलाइन बुकिंग केलेल्या भाविकांना श्री विठुरायाचे व्यवस्थितपणे दर्शन घेता येत आहे.
भाविकांची संख्या रोडावली- गेल्यावर्षीच्या कार्तिकी यात्रेच्या तुलनेत यावर्षी भाविकांची संख्या काहीशी रोडावल्याचे दिसत आहे. मंदिर समितीने नियुक्त केलेल्या खास महिला तसेच अन्य जातींमधील पुजारी मंडळींकडून या वर्षी प्रथमच शासकीय पूजेच्या वेळी मंत्रोपच्चार देवाचे पोशाख केले जाणार आहेत. कार्तिकी एकादशीचा सोहळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधून रेल्वे, एसटी, खासगी वाहनांमधून भाविक दाखल झाले आहेत.
पंढरपूर येथे वैकूंठवासी ह.भ.प. झेंडूजी बुवा महाराज बेळीकर मठामध्ये महसूल मंत्री झाल्याबद्दल ना.खडसे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, दूधसंघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, पोलिस अधिक्षक दत्तात्रय मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते.
40 वर्षापासून वारी करणारे सुरेश कुलकर्णी आणि वंदना कुलकर्णी या दाम्पत्याला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत महापूजा करण्याचा मान मिळाला. पूर्वापार चालत आलेली नित्यपूजा बडवे करत होते. यंदा प्रथमच कार्तिकी नित्यपूजा मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांच्या हस्ते झाली.
पुढे पाहा, कार्तिकी एकादशीची पंढरपूरातील छायाचित्रे...