आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोरल्या पवारांना चिंता प्राथमिक शिक्षणाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या घसरत्या दर्जाकडे बारकाईने पाहण्याची गरज आहे. पायाच कच्चा राहिला तर समाज ढासळेल. दर्जेदार प्राथमिक शिक्षण देण्याचे आव्हान स्वीकारण्याची वेळ आली आहे. भारती विद्यापीठासारख्या संस्थांनी या क्षेत्रातही आता लक्ष घालावे, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
भारती विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे संस्थापक व वनमंत्री डॉ. पतंगराव कदम आदी उपस्थित होते.


पवार म्हणाले की, उच्च शिक्षणात ज्ञानी पिढी तयार करण्याची जबाबदारी भारती विद्यापीठाने पेलली आहे. डॉ. पतंगराव कदम कोणतेही काम पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. रयत शिक्षण संस्थेत पार्टटाइम शिक्षक म्हणून काम सुरू केलेल्या या माणसाने उभे केलेले काम कौतुकास्पद आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, आज शिक्षणाचे व्यापारीकरण झाले असले तरी भारती विद्यापीठासारख्या काही संस्थांनी मूल्ये जपली आहेत. तर ‘दुष्काळी भागातून आलेला तरुण 19 व्या वर्षी शाळा काढतो अन् विद्यापीठाचे स्वप्न पाहतो, ही खरी वाटणारी गोष्ट नाही. पतंगरावांनी हे स्वप्न सत्यात उतरवले,’ असे शिंदे म्हणाले.


पतंगरावांचे ‘तेवढे’ राहिलेच!
आयुष्यात मिळवावे असे काही राहिले नाही, अशी समाधानाची भावना पतंगराव कदम यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली होती. याचा उल्लेख करत सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘पतंगराव बोलत असताना पवार मला म्हणाले, ‘एक तेवढे राहिलेय.’ पतंगरावांच्या बाबतीत काय राहिले आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मी वेगळे सांगण्याची गरज नाही. पण ‘ते’ माझ्या हातात नाही. शरदरावच ते करू शकतात.’ शिंदे यांच्या या वक्तव्याला पवारांसह सर्वांनाच हसून दाद दिली.