आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Theature Personality Atamaram Bhende No More

ज्येष्ठ नाट्यकर्मी आत्माराम भेंडे यांचे पुण्यात निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्येष्ठ नाट्यकर्मी आत्माराम भेंडे यांचे (वय 93) वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. पुण्यातील रत्ना हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भेंडे हे गेल्या सहा दशकाहून अधिक काळ रंगभूमीवर कार्यरत होते.
महाराष्ट्र शासनातर्फे मराठी नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारास देण्यात येणाऱ्या या रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराने भेंडे यांना गौरविण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी बेळगावमधील बाळासाहेब ठाकरे नगरी आज सज्ज झाली असतानाच भेंडे यांच्या निधनाचे वृत्त आल्याने नाट्यक्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेली सहा दशकांहून अधिककाळ मराठी रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून कार्यरत राहिलेल्या भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटर मधून आपली कारकीर्द सुरु केली. विनोदी अभिनेते आणि लेखक बबन प्रभू यांच्याबरोबर त्यांनी अनेक दर्जेदार विनोदी, फार्सिकल नाटकं केली. बबन प्रभू-आत्माराम भेंडे या जोडीने 'दिनूच्या सासूबाई राधाबाई', 'झोपी गेलेला जागा झाला', 'पिलूचं लग्न' आदी अनेक नाटके गाजविली. अभिनेता म्हणून भेंडे यांनी 'मन पाखरु पाखरु', 'प्रिती परी तुजवरती', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'तुज आहे तुजपाशी', 'पळा पळा कोण पुढे पळे' अशा नाटकांतून आपले अभिनय कौशल्य दाखविले.
मराठी रंगभूमीप्रमाणेच हिंदी, इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी कर्तृत्व गाजविले. तसेच दूरदर्शन मालिकाही त्यांनी दिग्दर्शित केल्या आहेत. त्यांना आतापर्यंत नाट्यदर्पण, शंकरराव घाणेकर, नाट्यभूषण, चिंतामणराव कोल्हटकर, नटसम्राट नानासाहेब फाटक तसेच 2006-07 साली महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्य सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते.