आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sessions Court Judge Justifies Capital Punishment To Santosh Mane

संतोष माने मनोरुग्ण नाही; फाशी योग्यच !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आरोपी संतोष मारोती माने मनोरूग्ण नसल्याचे सिद्ध झाले आहे. माणसाचा पापाचा घडा लपवण्यासाठी मनुष्य काय करु शकतो हे माने व त्याच्यावर उपचार करणारे सोलापूरचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दिलीप बुरटे यांच्या कृतीतून दिसून आले आहे. फाशीपेक्षा कमी शिक्षा त्याला दिली तर समाजात चुकीचा संदेश जाईल. हा अक्षम्य अपराध असून त्याने दुसर्‍यांचे मानवी हक्क हिरावले आहे, त्याला फाशीची शिक्षाच योग्य आहे, असे पुणे न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी निकालपत्रात नमूद केले.

न्यायाधीशांनी निकालपत्र देताना म्हटले आहे की, रात्रपाळीची डयुटी बदलून दिली नाही म्हणून मानेने स्वारगेट डेपोतील बस चोरली त्यानंतर तो लोकांना धडक देत मारत चालला होता. त्याला पीएमपीएल चालक अमर चव्हाण, पोलीस हवालदार बापू लोणकर यांनी गाडीत चढून थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे त्याने ऐकले नाही. पोलिसांनी रस्त्यात उभे केलेले अडथळे त्याने योग्य पध्दतीने बाजूला केले व कोणत्याही मोठया वाहनाला अथवा इमारतीला धडक दिली नाही. याचा अर्थ तो काय करत होता याची त्याला पूर्णपणे जाणीव होती.

पोलिसांचे एकत्रित यश
तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह मोहिते म्हणाले, तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या मार्गदशर्नाखाली विविध पोलीस चौकीतील कर्मचार्‍यांनी एकत्रित तपास करून पुरावे सादर केला. आरोपी वेडा नव्हता व त्याने सर्वसामान्य स्थितीत हे कृत्य केल्याचे निकालपत्रात सिध्द झाले आहे.

न्यायालयाने वाखाणले पोलिसाचे धाडस
संतोष माने बेदरकारपणे एसटी चालवत असताना पोलिस कर्मचारी बापू लोणकर यांनी ती बस थांबवण्यासाठी जीव धोक्यात घातला होता. धावत्या बसच्या टपावरून ड्रायव्हर केबिनमध्ये उतरून लोणकर यांनी मानेला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धाडसाचे कोर्टाने कौतुक केले.