आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शहरातील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणा-या कोरेगाव पार्क परिसरातील एका फ्लॅटवर पोलिसांनी मंगळवारी छापा टाकून हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. वेश्या व्यवसायात अडकलेल्या बांगलादेश, नेपाळ, उझबेकिस्तान या देशातील तरुणींसह 12 जणींची सुटका केली, तर पाच आरोपींना अटक करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एल. वानखडे यांच्या न्यायालयाने पाचही आरोपींना 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सोलापूरचीही तरुणी
आरोपींमध्ये रामदेव खरबू यादव (रा.झारखंड), इस्माइल कौसर शेख (रा.अहमदपूर, लातूर), व्यंकटेश वेगन्नाराव (रा.आंध्र प्रदेश), योगेश सुरेश पवार (रा.नागपूर) व महादेव ज्ञानोबा मुसुले (रा. नांदेड) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून आठ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला, तर सुटका करण्यात आलेल्यांमध्ये विदेशातील तीन, पश्चिम बंगालमधील सात, दिल्ली व सोलापूर येथील प्रत्येकी एक मुलीचा समावेश असल्याचे पोलिस पथकाच्या वतीने सांगण्यात आले.

अशी झाली कारवाई
कोरेगाव पार्कमधील गोल्डफिल्ड प्लाझा येथे अनेक दिवसांपासून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास छापा टाकला. या वेळी पाच आरोपींना अटक करण्यात आली, त्यांच्यावर पिटा अँक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. सरकारी वकील सुचित्रा नरोटे यांनी न्यायालयात सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी शहरात कुठे कुठे मुली पुरविल्या, कोणा कोणाची मदत घेतली याचा तपास करणे आहे. आरोपींचे शहरात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून त्यांचे इतर साथीदार कोण याचा तपास पोलिसांना करावयाचा आहे.