आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सावली’सुद्धा जेव्हा पाठ सोडते; खगोलीय चमत्कार अनुभवण्याची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कधीही आपली साथ न सोडणारी गोष्ट म्हणजे स्वत:ची सावली. मात्र, ही सावली येत्या आठवड्यात तुमची पाठ सोडणार आहे. पृथ्वीच्या प्रवासातील बदलामुळे हा गमतीदार खगोलीय चमत्कार अनुभवण्याची संधी भारतवासीयांना मिळणार आहे.

ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे सचिव डॉ. सागर गोखले यांनी बिनसावलीच्या दिवसाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘उत्तरायण-दक्षिणायणामुळे सूर्य खगोलीय विषुववृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला प्रवास करतो. उत्तरेला प्रवास करताना सूर्य आपल्या गावाच्या अक्षांशाइतक्या अंशांवर आला की त्या दिवशी आपल्या गावी सूर्य स्थानिक वेळेनुसार बारा वाजता डोक्यावर म्हणजेच खºया मध्य बिंदूवर येतो. या दिवसाला ‘झीरो शॅडो डे’ किंवा बिनसावलीचा दिवस म्हणतात. कर्कवृत्ताच्या उत्तरेला व मकरवृत्ताच्या दक्षिणेला ही घटना कधीच घडत नाही.

अर्धा मिनिट हरवेल तुमची सावली
‘झीरो शॅडो डे’ला पृथ्वीतलावर काटकोनात असलेल्या कोणत्याही वस्तूची सावली पडणार नाही. उदाहरणार्थ रस्त्यावर उभा असलेला लाइटचा खांब. सावली गायब होण्याचा कालावधी जास्तीत जास्त तीस सेकंदांचा असेल. सूर्य 21 जूनपर्यंत कर्कवृत्तापर्यंत प्रवास करून दक्षिणेला परत फिरला की जुलैमध्ये ‘झीरो शॅडो डे’ पुन्हा येतो; परंतु जुलै महिन्यात मान्सून काळ असल्याने भारतात त्याचा अनुभव घेता येईलच याची खात्री नसते. त्यामुळे बिनसावलीच्या दिवसाची गंमत उन्हाळ्यात अनुभवावी, असे गोखले यांनी सांगितले.

झीरो शॅडो डे
खगोलीय भाषेतील ‘झीरो शॅडो डे’ शहरांच्या अक्षांशानुसार वेगळा असणार आहे. राज्यातील प्रमुख शहरांच्या बिनसावलीचा दिवस आणि वेळ पुढीलप्रमाणे असेल.

नगर - 16 मे, दुपारी 12.27
औरंगाबाद - 18 मे, दुपारी 12.25
बीड - 15 मे, दुपारी 12.23
उस्मानाबाद - 12 मे, दुपारी 12.22
परभणी - 16 मे, दुपारी 12.19
लातूर - 13 मे, दुपारी 12.20
धुळे - 24 मे, दुपारी 12.28
जळगाव - 25 मे, दुपारी 12.25
नाशिक - 19 मे, दुपारी 12.31