Home »Maharashtra »Pune» Shah Under Income Tax ; Charges Of Jadhav's Sun Marriage

जाधवांच्या मुलाचे लग्न शहांना पडले महाग

विशेष प्रतिनिधी | Feb 20, 2013, 05:55 AM IST

  • जाधवांच्या मुलाचे लग्न  शहांना पडले महाग

पुणे - कराड येथील शहा कन्स्ट्रक्शनच्या मालकीची विविध कार्यालये आणि हॉटेलांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. राज्याचे नगरविकास राज्यमंत्री आणि चिपळूणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्करराव जाधव यांच्या मुलांच्या लग्नात कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याच्या मुद्द्यावरून शहा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.
‘जाधव यांच्या विवाहातील झगमगाट आणि खर्चाची जोरदार चर्चा झाली. प्रसारमाध्यमांमधून उपलब्ध झालेल्या तपशिलाचा आधार घेऊनच शहा यांच्या आर्थिक स्रोतांची माहिती घेण्यासाठी झाडाझडती सुरू करण्यात आली. आयकर विभागाला सेक्शन 132 तसेच 133 (अ) अंतर्गत अशा ‘सर्च’चे अधिकार आहेत. याच पद्धतीने रत्नागिरीमध्येही जाधव यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. आर्थिक उत्पन्न आणि स्रोत यांचा ताळमेळ न बसल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते,’ असे आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

‘राष्ट्रवादी’चे नेते शरद पवार यांनी जाधव यांच्या शाही विवाहाचे वृत्त ऐकून जोरदार टीका केली होती. त्यानंतर जाधव यांनी विवाहातील खर्च आपण केला नसून शहा यांनी केल्याचा दावा केला.यामुळे आयकर विभागाने स्वत:हून शहा आणि जाधव या दोघांचीही चौकशी सुरू केली. ‘शहा यांच्याशी आपले कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक वा अन्य संबंध नाहीत. त्यांना फक्त केटरिंगचे काँट्रॅक्ट दिले होते,’ असा खुलासा जाधव यांनी केला. मात्र, बांधकाम व्यवसायात असलेल्या शहा यांना केटरिंगचे काँट्रॅक्ट कसे मिळाले, याची चर्चा कराड परिसरात रंगली होती.

दरम्यान, आयकर विभागाचे अधिकारी डॉ. ठाकूर यांनी ही तपासणी नियमित स्वरूपाची असून दरवर्षी अशी ‘स्पॉट व्हिजिट’ केली जात असल्याचे सांगितले. अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.

राजकीय लागेबांधे
यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून शहा कुटुंबीय राज्यकर्त्यांशी लागेबांधे राखून आहे. राजकीय नेत्यांशी असलेल्या घनिष्ठ संबंधांतून त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाचे सिंचन प्रकल्प, रस्ते, पूल आदी ‘मालदार’ कामे केली आहेत. सरकारी कंत्राटदार असलेल्या शहा यांच्या मालकीचे ‘पंकज’ हे आलिशान हॉटेल कराड येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतच आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून ते शरद पवारांपर्यंत सर्व नेत्यांची कराड येथे आल्यावर या हॉटेलमध्ये ऊठबस असते. राजकीय बैठकांचा अड्डा म्हणून ‘पंकज’ची ओळख आहे.

तीस तासांची ‘स्पॉट व्हिजिट’
आयकर विभागाने शहा कन्स्ट्रक्शनची कराडमधील सर्व कार्यालये, पंकज हॉटेल तसेच शहा यांच्या निवासस्थानी एकाच वेळी छापे घातले. सुमारे साठ अधिका-यांचे पथक या कारवाईत सहभागी आहे. आयकर विभागाने सोमवारी दुपारी बारानंतर सुरू केलेली कारवाई मंगळवारी सायंकाळी सहानंतरही सुरू होती. तीस तासांहून अधिक वेळ चाललेल्या धाडसत्रात अनेक गोपनीय कागदपत्रे व दस्तऐवज हस्तगत केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आयकर विभागाच्या वतीने या छाप्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

Next Article

Recommended