आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाचा दर्प चढलेल्या गद्दाराला बाजूला करा- पवारांचा जगतापांवर हल्लाबोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काही लोकांना पक्षाने मागील काळात मोठी ताकद दिली. मात्र त्यांनीच आता पक्षाशी गद्दारी केली आहे. ज्या पक्षाने पद, सत्ता, प्रतिष्ठा दिली ते विसरून एका रात्रीच दुस-या पक्षाची उमेदवारी स्वीकारली. पण सर्व काही पैशाने होत नाही. पैशाने विश्वास तर मिळवताच येत नाही. पैशाचा इतका दर्प चढलेला माणूस अलीकडच्या काळात मी पाहिला नाही. पण या पैशांचा दर्प चढलेल्या गद्दाराला जनता खड्यासारखी बाजूला करेल हे आगामी काळात दिसेलच अशा कडक शब्दात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पक्षातून बाहेर पडलेले लक्ष्मण जगताप यांनी हल्ला चढविला.
मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकरांच्या प्रचारसभेत शरद पवार बोलत होते. यावेळी पतंगराव कदम, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, रामशेठ ठाकूर उपस्थित होते. पवार म्हणाले, आम्ही गेली सहा महिने लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी करीत होतो. मावळमधून संजोग वाघेरेसह जगतापही इच्छुक होते. त्यांनी माझी भेट घेऊन तशी इच्छाही व्यक्त केली. एवढेच नव्हे तर मी घाटाखालील इतर सहका-यांशी संवाद वाढविण्यासाठी भेटीगाठी घालून दिल्या. पण एका रात्रीत काही तरी ढोंग दाखवून पक्षाची उमेदवारी नाकारली. ज्या पक्षाने सत्ता, पदे दिली ते सगळे विसरले. तुम्ही हे विसरलात पण जनता हे विसरणार नाही. तुम्हाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
पवार पुढे म्हणाले, मी लोकसभेत 7 वेळा गेला. पिंपरी-चिंचवडकरांनी मला 6 वेळा मतदान केले. तुम्ही माझ्या पाठिशी कायम उभे राहिला. पालिकेतही एकहाती सत्ता दिली. त्यामाध्यमातून तुमच्या भागाचा विकासही केला. आताही तसेच खंबीरपणे राष्ट्रवादीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा. काही लोकांना जमिनीतून पैसे मिळाल्याने हवेत आहेत. अनेक लोकांनी जमिनीतीन पैसा कमिवला पण इतका पैशांचा दर्प चढलेला माणूस मी अलीकडच्या काळात पाहिला नाही. सगळे काही पैशांतून विकत घेता येत नाही. नम्रता, पक्षनिष्ठा तर विकत घेता येतच नाही. एका रात्रीत शेकापची उमेदवारी घेतली खरी पण त्या पक्षाचा इतिहास, तत्वज्ञान काही माहित आहे. त्यातील एक अक्षरही माहित नसलेला हा नेता आता शेकापच्या माध्यमातून तुमच्या घरांचा प्रश्न सोडविणार आहे का असा सवाल पवारांनी जनतेला विचारला.
शहरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना फटकारताना पवार म्हणाले, दिवसा एक आणि रात्री एक असे काहीतरी चालल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे. पण तुम्ही असे काही करू नका. पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊन जो काम करेल त्याला क्षमा नाही. पक्षविरोधी काम करणा-या माझ्या एका जवळच्या मंत्र्याला पक्षासह मंत्रिमंडळातून बाहेर काढले आहे. तेव्हा बारीक-सारीक संत्र्यांची काय होईल ते तुम्हीच ठरवा. पक्षाशी धोकेबाजी करू नका. उद्यापासून चित्र बदलले पाहिजे. नार्वेकरांना विक्रमी मतांनी निवडून द्या असे आवाहनही पवार यांनी केले.