आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री फडणवीसच गुन्हेगारांना ‘पावन’ करून घेताहेत: शरद पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - “भाजपच्या उमेदवारांचे क्वालिफिकेशन काय तर खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार. या सगळ्यांना पावन करून घ्यायला साक्षात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रच. त्यात पुन्हा ‘फडणवीस.’ आम्ही पुणेकरांनी नाना फडणवीसाचे कारनामे ऐकले आहेत. या नव्या फडणवीसांचे काय? भाजपने कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र अशी जाहिरात केली होती. आज सामान्य माणूस हाच प्रश्न भाजपला विचारतो आहे,’ अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केली.  

महापालिका निवडणूक प्रचारासाठी पुण्यात घेतलेल्या पहिल्याच सभेत पवारांनी ४०  मिनिटांच्या भाषणात राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “काँग्रेस आघाडी सरकारमध्येही काही मतभेद होते, पण आम्ही ते चव्हाट्यावर आणत नव्हतो. किती भांडायचे याचे तारतम्य आम्ही ठेवले होते. आज मंत्रिमंडळात ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्यावरच मुख्यमंत्री टीका करतात.
 
शिवसेनेचे उद्धव ठाकरे सांगतात भाजप हा गुंडांचा पक्ष आहे आणि मुख्यमंत्री पुण्यात येऊन सांगतात शिवसेना हा खंडणीबहाद्दरांचा पक्ष आहे. दोघेही एकत्र बसत असल्याने एकमेकांबद्दल ते खरेच बोलत असणार. काय चालले आहे राज्यात नेमके? गेल्या अडीच-तीन वर्षांत मुख्यमंत्र्यांनी विदर्भात, वऱ्हाडात काय कर्तृत्व दाखवले याचा हिशोब द्यावा. मला खात्री आहे त्यांची वही कोरी असेल, असे पवार म्हणाले. ‘मी राज्याचा मुख्यमंत्री असताना जगभरातून येणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी रोज मला दोन तास बाजूला काढून ठेवावे लागायचे. आज काय स्थिती आहे?’, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.  

लबाडाचे आवतण  
“मोदी बोलतात छान. पटवून देण्यात ते हुशार आहेत. त्यांनी सांगून टाकले हे करू ते करू. काळा पैसा आणणार. लोकांना खरे वाटले. गडी बोलतोय म्हणजे आणणारच. माझ्या खात्यात अाठ- नऊ लाख रुपये येणार असतील तर एक मत गेले तरी हरकत नाही.  प्रत्यक्षात काय झाले? मोदी स्वित्झर्लंडला जाऊन हात हलवत परत आले. लबाडाचे आवतण जेवल्याशिवाय खरे नसते,” असे पवार म्हणाले.
 
बातम्या आणखी आहेत...