आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Comment On Opposition Party For Onion Rate Issue

कांद्याची चर्चा ऐकून कातडी बधिर झालीय; शरद पवार यांचा टीकाकारांना टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती- कांदा दरवाढीवरून सतत टीकेचे धनी झालेले केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी सर्वांना चकित करणारी प्रतिक्रिया दिली. ‘कांदा दरवाढीचा माझ्याशी संबंध जोडून याला सर्वस्वी मीच जबाबदार असल्याची चर्चा काही वर्षांपासून सुरू आहे. त्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. अशा चर्चा ऐकून आता माझी कातडी बधिर झालीय,’ असा टोला त्यांनी टीकाकारांना लगावला. यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचा पुनरुच्चारही पवारांनी केला.

बारामतीत उभ्या राहिलेल्या एका लॉजेस्टिक गोदामाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पर्यटन राज्यमंत्री सुरेश धस, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, कांद्याचा भाव वधारला की माझा फोटो टीव्हीमध्ये दाखवतात. दिल्लीत माझ्या घरावर मोर्चे येतात. वाढत्या महागाईमुळे शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्याप्रमाणे शेतमालालाही भाव मिळाला पाहिजे, अन्यथा शेतकरी उद्ध्वस्त होईल. परिणामी देशातील 100 कोटींपेक्षा जास्त जनतेचा अन्नाचा प्रश्न निर्माण होईल. मी शेतकर्‍यांना उद्ध्वस्त होऊ देणार नाही,’ असे सांगत पवारांनी अन्न सुरक्षा कायद्याबाबत केंद्राला चिमटा काढला.

शेतकर्‍यांचे अर्शू दिसत नाहीत
‘एखाद्या वेळीच भाव वाढल्याने कांद्याला चांगला भाव मिळतो, परंतु अनेक वेळा शेतकर्‍यांना बेभाव कांदे विकावे लागतात. कधी कधी फेकूनही द्यावे लागतात. काही वेळेस त्यांचा वाहतुकीचा खर्चही निघत नाही. त्या वेळी शेतकर्‍यांच्या डोळय़ातील पाणी कोणाला दिसत नाही,’ अशी टीकाही शरद पवार यांनी केली.