पुणे- मराठवाड्यासह विदर्भ, सोलापूर, सातारा व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आतापासूनच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही टंचाई पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांच्याही कानावर मी घातली आहे. अशा परिस्थितीत केंद्राने राज्य सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केली.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ३२५ पाल्यांचे पूर्ण शैक्षणिक पुनर्वसन करण्याची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे. या विद्यार्थ्यांचे स्वागत संघटनेच्या वतीने पवार यांच्या उपस्थितीत येथे करण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट, शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, "नैसर्गिक आपत्तीनंतर पुनर्वसनासंदर्भातील धोरण आणि कायदा करण्याचे काम माझ्यावर सोपवण्यात आले होते, पण समाजाची साथ असल्याशिवाय सरकारी धोरणे यशस्वी होत नाहीत. संकटात पक्षभेद विसरून एकजुटीने उभे राहणे ही आपली संस्कृती आहे. या वेळी बापट यांचेही भाषण झाले.
यानिमित्ताने संकटांशी मुथा आणि माझेही नाव जोडले गेले आहे.”
बापट म्हणाले, “आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील मुलांना मुथा यांनी मोठे जग दाखवले आहे. संकटावर कशी मात करायची, हे त्यांना येथे शिकता येईल. सरकारी मदतीला काही मर्यादा असतात. उपकाराच्या भावनेपेक्षा जबाबदारी आणि कर्तव्याच्या भावनेने केलेली मदत अधिक महत्त्वाची असते, हे मुथा यांनी दाखवून दिले आहे.''
मदत मिळवू
दुष्काळाची पाहणी करणाऱ्या पथकावर शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. तो स्वाभाविक आहे, पण प्रत्यक्षात अधिकाऱ्यांचा त्यात दोष नाही. सध्या पाण्याची परिस्थिती गंभीरच आहे. फळबागा टिकवणे अवघड बनले आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यातील सारे खासदार केंद्र सरकारकडून अधिकाधिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करतील, असे शरद पवार म्हणाले.