पुणे - 'शरद पवार कृषिमंत्री असताना राज्यात दरवर्षी साडेतीन हजार शेतक-यांच्या आत्महत्या होत होत्या. राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असताना १७ जिल्हा बँका बंद पडल्या. अनेक साखर कारखाने देशोधडीला लागले. आदर्श घोटाळ्यासह शंभर घोटाळे झाले. शरद पवारांमुळे महाराष्ट्र बदनाम झाला,’ अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा यांनी सोमवारी केली.
‘गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने वैभवशाली महाराष्ट्राचे वाटोळे केले. गुंडगिरी व भ्रष्टाचार वाढविला. महाराष्ट्राला पुन्हा देशात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी भाजपला पूर्ण बहुमत द्या,’ असे आवाहन शहा यांनी केले. खेड-आळंदी (जि. पुणे) विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शरद बुट्टे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. शरद पवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना शहा यांनी लक्ष्य केले. "राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी सिंचन घोटाळा केला. आदर्श घोटाळ्यासह एकूण १०१ घोटाळे होऊन गेल्या पंधरा वर्षांत ११ लाख ८८ हजार कोटींचा भ्रष्टाचार राज्यात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची पंधरा वर्षांपूर्वीची स्थिती आणि आजची आर्थिक स्थिती काय आहे हे पाहा,’ असे आवाहन शहा यांनी केले. चव्हाण यांनी कारकिर्दीत कधी फाइलवर सही केली नाही आणि आता जाहिरातींमध्ये सही करीत आहेत. चव्हाण हे वरून खाली आलेले मुख्यमंत्री आहेत, त्यांना जनतेच्या समस्या काय समजणार, अशी टीका त्यांनी केली. "काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आम्हाला गेल्या तीन महिन्यांत काय केले याचा हिशेब विचारीत आहेत. परंतु, गेल्या दहा वर्षांचा हिशेब पाहिला तर तुम्ही घोटाळेच केले आहेत. टू जी स्पेक्ट्रम, हेलिकॉप्टर, सीडब्ल्यूजी, इस्रो, एअरपोर्ट, कोळसा गैरव्यवहार केला म्हणूनच जनतेने तुम्हाला घरी बसविले. याउलट मोदी सरकारने गेल्या तीन महिन्यांत देशाची मान जगात उंचावली. स्वच्छता अभियान, बेटी बचाव अभियानाची सुरुवात केली. जन-धन योजनेतून एका महिन्यांत पाच कोटी गरीब जनतेची बँकांची खाती उघडली. आमच्याच काळात पेट्रोल-डिझेलचे दर खाली येऊ लागले आहेत,’ याकडेही शहा यांनी लक्ष वेधले.
काँग्रेसला काय अधिकार?
'शिवछत्रपतींचा वारसा सांगण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीला काय अधिकार? शिवाजी महाराजांचे नाव घेणा-या या आघाडी सरकारने मुंबईत छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही,’ असा सवाल शहा यांनी केला. भाजपचे सरकार आल्याबरोबर स्मारकाचे काम पूर्ण केले जाईल, असे ते म्हणाले.