आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांच्या आमंत्रणावरून PM मोदी ‘उसाच्या फडात’, वसंतदादा साखर संस्थेत येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ नोव्हेंबर राेजी मांजरी (जि. पुणे) येथील वसंतदादा साखर संस्थेला (व्हीएसआय) भेट देत आहेत. ‘व्हीएसआय’ला येणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान असतील. गेल्यावर्षी १४ फेब्रुवारी राेजी (‘व्हॅलेंटाइन डे’) मोदींनी पवारांच्या बारामतीला भेट देत तेथील विकासाचे कौतुक केले होते. त्यानंतर वर्षभरातच पवार अध्यक्ष असलेल्या ‘व्हीएसअाय’ संस्थेत माेदी येत अाहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, साखर कारखानदार आणि शास्त्रज्ञांनी एकत्र येत १९७५ मध्ये डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. मात्र पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे नाव संस्थेला देण्यात आले. वसंतदादा पाटील यांच्या शंभराव्या जयंतीचे निमित्त साधून ‘व्हीएसआय’मध्ये आंतरराष्ट्रीय ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद‌्घाटनला माेदी येत अाहेत. राज्यपाल सी. व्ही. राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्यासह अनेक मंत्री, साखर कारखानदार यांचीही प्रमुख उपस्थिती असेल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अाचारसंहिता असल्यामुळे माेदींचा दाैरा रद्द हाेणार असल्याची चर्चा हाेती. मात्र हा कार्यक्रम राजकीय नसून शेती तंत्रज्ञानासंदर्भातला असल्याचे स्पष्टीकरण ‘व्हीएसआय’ने निवडणूक आयोगाला दिले. त्यानंतर या दौऱ्यासंबंधीची अनिश्चितता संपुष्टात आली. केवळ याच कार्यक्रमासाठी दुपारी चार वाजता मोदी पुण्यात येणार आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचा नारळ फोडून जंगी प्रचारसभा घेण्याची आखणी भाजपतर्फे केली जात होती. मात्र अाचारसंहितेमुळे भाजपला सभेचे नियाेजन रद्द करावे लागले. तसेच ऊस शेतकरी व साखर कारखानदारांच्या प्रश्नांसंदर्भातही अाचारसंहितेमुळे मोदींकडून कोणतेही आश्वासन मिळण्याची शक्यता नाही. दरम्यान, १६ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत ऊस पीक प्रात्यक्षिके, चर्चासत्रे, प्रदर्शन आदी भरगच्च कार्यक्रम हाेत अाहेत.

शरद पवारांकडून शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न!
साखरपट्ट्यातील शरद पवारांच्या ताकदीचे प्रदर्शन नरेंद्र मोदींपुढे करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना प्रत्येकी दोन बसगाड्या भरून शेतकरी आणण्यास सांगण्यात आले आहे. मात्र कडेकोट बंदोबस्तामुळे सर्वांना सभेच्या ठिकाणी प्रवेश मिळण्याची चिन्हे कमी आहे. सभास्थानी तीन हजार आसनक्षमतेचा मंडप उभारण्यात आला आहे.

मोदींच्या स्वागतासाठीे ‘व्हीएसआय’ चकाचक
उसाच्या सुधारित वाणांच्या आधुनिक तंत्राने लागवड केलेल्या प्रात्यक्षिक ‘प्लॉट’ची पाहणी मोदी करणार आहेत. मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने गेल्या तीन महिन्यांपासून व्हीएसआयचा कायापालट सुरू आहे. प्रदर्शन मंडप, सभामंडप आदींच्या उभारणीसाठी दोन कोटींहून अधिक खर्च करण्यात अाला अाहे. तर इमारतींची रंगरंगोटी, रस्त्यांची कामे आदीसाठी दीड कोटींपर्यंत खर्च झाला आहे. व्हीएसआयची आर्थिक स्थिती लक्षात घेता कोंड्याचा मांडा करून खाण्याची वेळ संस्थेवर आल्याची माहिती मिळाली.
बातम्या आणखी आहेत...