आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sharad Pawar Gives Contestent Againest Prithiviraj Chavan At South Karad Assembly

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरद पवार काढणार पृथ्वीबाबांचा काटा, कराडमधून उंडाळकरांना राष्ट्रवादीचे तिकीट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काँग्रेस आणि राष्ट्रवादीत स्वतंत्र लढविण्याचे स्पष्ट झाल्याने दक्षिण कराडमधील काँग्रेसचे विदयमान आमदार विलासकाका उंडाळकर यांनी राष्ट्रवादीचे तिकीट मिळविण्याचा प्रयत्न सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उंडाळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाशी संपर्क साधला असून, त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कळते आहे. त्यामुळे दक्षिण कराडमध्ये काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीकडून विलासकाका उंडाळकर यांच्यात अटीतटीची लढत होईल असे बोलले जात आहे. पृथ्वीराज चव्हाणांचा दक्षिण कराडमध्येच अडकवून ठेवायचे व काहीही करून पराभूत करून राज्याचे मैदान मारायचे अशी रणनिती शरद पवार-अजित पवार हे काका-पुतणे ठरवू शकतात. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच पण आता काँग्रेसमधून भाजपात गेलेले अतुल भोसले हे भाजपचे उमेदवार असतील.
शरद पवार-पृथ्वीबाबांत जुनात राजकीय वाद- शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात राजकीय सख्य कधीच राहिले नाही. पृथ्वीराज चव्हाण यांना 80 च्या दशकात राजीव गांधींनी काँग्रेसमध्ये आणल्यावर पवारांच्या राजकीय चलाखीबाबत ते नेहमीच राजीव गांधींना माहिती देत असत. त्यामुळे राजीव गांधी पवारांना नेहमीच हाताच्या अंतरावर ठेवत असत. शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचे सरकार कसे पाडले व काँग्रेसचे नुकसान केले याची इंत्थभूत माहिती राजीवजींना पृथ्वीराज यांच्या माध्यमांना मिळाली होती. त्यामुळे पवारांना पृथ्वीराज चव्हाण हे नेहमीच आपल्या मार्गातील अडथळा वाटत राहिले आहेत. 1991, 1996 व 1998 सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांनी कराड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, पवारांनी प्रत्येक वेळी त्यांना पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडले. मात्र पवारांना त्यावेळी यश आले नाही. मात्र, 1999 मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी मात्र राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पाटील यांनी पृथ्वीबाबांना पराभूत केले. त्यावेळी पवारांनीच बारीक लक्ष देऊन पृथ्वीराजबाबांचा काटा काढल्याचे सर्वांनाच माहित आहे. हा पहिला अंक होता. मात्र पृथ्वीराज चव्हाण चार वर्षापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीतून मुंबईत आले. मागील चार वर्षाच्या काळात पृथ्वीबाबांनी राष्ट्रवादीला खिळखिळी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यात त्यांना ब-यापैकी यश आल्याचे मानले जात आहे. याचमुळे भाजप-शिवसेनेची 25 वर्षाची अभेद्य युती तुटताच राष्ट्रवादीने तासाच आघाडी तोडत असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी इतक्या दिवस राजकीय गरज म्हणून पृथ्वीबाबांचा त्रास सहन करीत होती. मात्र संधी मिळताच शरद पवार व अजित पवार यांनी सवतासुभा उभारला आहे.
दुसरीकडे, पृथ्वीराज चव्हाण आता विधानसभेच्या रिंगणात दक्षिण कराडमधून उतरले आहेत. चव्हाण यांना तिकीट देताना काँग्रेसने सलग 7 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले विलासकाका उंडाळकर यांचे तिकीट त्यांना विचारात न घेता थेट कापले. त्यामुळे उंडाळकर अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्याचवेळी चव्हाण यांचे समर्थक अतुल भोसले यांनी विरोधीपक्षाची मते खाण्यासाठी व चव्हाणांना तिरंगी लढतीचा थेट फायदा होण्यासाठी भाजपात प्रवेश केला. मात्र, आता राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी तुटताच विलासकाका उंडाळकर यांनी शरद पवार व अजित पवार यांच्याशी संपर्क साधला आहे. पक्षाने तिकीट दिल्यास आपण राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढायला तयार आहे असा निरोप दिला. राष्ट्रवादीचे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी विलासकाकांशी तत्काळ संपर्क साधत पक्षांकडून तिकीट देईल अशी सोय करू असा शब्द दिल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विलासकाकांच्या माध्यमातून पृथ्वीबाबांचा काटा निघत असेल तर काहीच हरकत नाही असा विचार करीत राष्ट्रवादीने विलासकाकांना उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याचे कळते आहे.