आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार म्हणाले, पुणेकरांचा मला हेवा वाटतो

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘‘उस्मानाबादला चौदा दिवसांतून एकदा पाणी येते. सोलापूरला सहा दिवसांतून पाणी मिळते, तर मनमाडला सोळा दिवसांतून एकदा. तुम्हाला मात्र दिवसातून दोनदा पाणी मिळते. तुमचा हेवा वाटतो,’’ अशी भावना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. पाण्याबाबत पुणेकर सुदैवी असले तरी त्यांनी पाण्याचा वापर कसोशीनेच करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘‘उपलब्ध होणारे पाणी साठवून ठेवणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि वापरलेले पाणी शुद्ध करून खाली सोडणे याच्याशी यापुढे तडजोड करता येणार नाही. लोकप्रतिनिधींनी यादृष्टीने जागरूकतेने काम केले पाहिजे,’’ असे पवार म्हणाले. तळजाई टेकडीवर महापालिकेने बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी महापौर वैशाली बनकर यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा तीन धरणांपैकी उजनी व जायकवाडी ही दोन धरणे कोरडी आहेत. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांमध्ये पाण्याचे संकट आणखी गंभीर बनणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

आजपासून मराठवाड्याचा दौरा - ‘‘दुष्काळी भागाला मदत करण्यासाठी सरकारने नेमलेल्या समितीचा अध्यक्ष मी आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी आर्थिक अडचण येणार नाही, याची काळजी घेऊ,’’ असे पवार यांनी सांगितले. रविवारपासून औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा दौरा करून दुष्काळी स्थितीचा मी स्वत: आढावा घेणार आहे.