आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांची प्रकृती स्थिर; हवा पालटासाठी आठवडाभर जाणार म्हैसूरला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोल्हापूर, सांगलीचा दौरा अर्धवट सोडून रविवारी पुण्यातील घरी परतले. सांगली येथे समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव यांच्यासोबतच्या कार्यक्रमासाठी ते कोल्हापूरहून जाणार होते. परंतु कोल्हापुरातूनच ते परतले. तथापि, पवार यांची प्रकृती स्थिर असून, कफ व खोकल्याचा त्यांना थोडा त्रास होत आहे. नियोजित कार्यक्रमानुसार सोमवारी पवार बंगळुरूला जाणार आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली.


कोल्हापूर येथील एका जाहीर कार्यक्रमात पवारांनी भाषण केले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास ते तेथून बाहेर पडले. त्यानंतर तब्येत ठीक नसल्याचे त्यांनी सांगितले. डी.वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सर्किट हाऊसवर तपासणी केली. तेव्हा त्यांचा रक्तदाब, साखर नॉर्मल असल्याचे स्पष्ट झाले. खोकला व कफाचा त्रास वाढल्याने त्यांनी पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील एका बिल्डरच्या खासगी हेलिकॉप्टरने ते परतले. हेलिपॅडवर उतरल्यावर चालत जाऊन वाहनात बसले. शिवाजीनगरातील सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी दुपारनंतर त्यांनी विश्रांती घेतली. सांगलीतील कार्यक्रमात मुलायमसिंह आणि पवार एका व्यासपीठावर येणार होते. दीर्घ कालावधीनंतर दोन्ही नेते एकत्र येणार असल्याने कार्यक्रमाविषयी उत्सुकता होती. परंतु शरद पवार दौरा अर्धवट सोडून परतल्यामुळे वेगवेगळ्या अफवांना ऊत आला होता. दरम्यान, आज ते हवा पालटासाठी आठभरासाठी बंगलोर, म्हैसूर, उटीला जात असल्याचे कळते.

‘रक्तदाब वाढला’, ‘साखर कमी झाली’, ‘पवारांचा आजार राजकीय आहे’, ‘त्यांना मुंबईला हलवावे लागणार’, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.