सातारा- मागील आठवड्यात जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेले कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक यांना बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमधील शैक्षणिक संकुलात नोकरी देऊ, त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देऊ तसेच हक्काचे कायमस्वरूपी घरही देऊ असा शब्द माजी संरक्षणमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाडिक कुटुंबियांना दिला.
शरद पवार यांनी मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास साता-यातील पोगरवाडीत जाऊन शहीद कर्नल महाडिक यांच्या कुटुंबियांच्या भेट घेतली. यावेळी त्यांनी महाडिक यांच्या पत्नी स्वाती, मुले स्वराज, कार्तिकी, भाऊ जयंवत, बहिण विजया यांचे सात्वंन केले. यावेळी पवारांनी महाडिक कुटुंबांची सर्व बारीक-सारीक माहिती घेतली. वीरपत्नी स्वाती यांचे शिक्षण किती झाले, मुले कोणत्या शाळेत आहेत, भविष्यात कुठे राहण्याचा विचार आहे आदी बाजू समजून घेतल्या.
यावेळी स्वाती या उधमपूर येथील आर्मी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. सरकारी मदत मिळेल ती घ्या, सर्व सोयी-सुविधांचा लाभ घ्या पण आता उधमपूर येथे लांब जाण्यापेक्षा जवळच नोकरी करा असा विचार पवारांनी सुचवला. त्याचेवळी तुमची तयारी असेल तर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये नोकरी करा, मुलांना मोफत शिक्षण देऊ व बारामतीत हक्काचे घरही देऊ असा प्रस्ताव पवारांनी महाडिक कुटुंबियांसमोर ठेवला. यावर विचारविनियम करून निर्णय कळवू असे महाडिक कुटुंबियांनी पवारांना सांगितले. तसेच त्यांचे आभार मानले.