आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींना खड्यासारखे बाजूला करा : शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘नरेंद्र मोदी भारत ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची भाषा करतात; परंतु जातीयवादमुक्त-सांप्रदायिकतामुक्त भारतासाठी मोदी यांच्यासारखी प्रवृत्ती खड्यासारखी बाजूला ठेवा,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी केले. माणसा-माणसांतील वैर, संघर्ष कसे वाढेल, हे पाहणारी प्रवृत्ती देशात वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे आदी उपस्थित होते. दरम्यान, अनेक दिवसांपासून ‘राष्ट्रवादी’च्या संपर्कात असलेले परभणीचे शिवसेना खासदार गणेश दुधगावकर यांनी या वेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

मोदींवर टीका करताना पवारांनी काँग्रेसची मात्र स्तुती केली. ‘काँग्रेस ही दीडशे वर्षे जुनी संस्था आहे. या संस्थेने देश उभा केला. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे काम केले. पंडित नेहरू, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, यशवंतराव चव्हाण या नेत्यांनी देश घडवण्याची भूमिका बजावली असल्याचे ते म्हणाले. ‘खासदारांच्या बहुमताचा पत्ता नाही. त्या आधीच भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवून टाकला. देशाचा पंतप्रधान होऊ इच्छिणार्‍याला किमान देशाचा इतिहास तरी माहिती असायला हवा, असेही ते म्हणाले.

रटाळ भाषणे; निरुत्साही श्रोते
पुणे, बारामती, शिरूर, मावळमधील आघाडीच्या प्रचाराचा नारळ बुधवारच्या प्रचारसभेत वाढवण्यात आला. या सभेला गर्दी जमवण्यासाठी काँग्रेस आघाडीने जिल्ह्यातून गाड्यांची व्यवस्था केली होती. तरीही कशीबशी पाच हजारांची गर्दी जमू शकली. मंडप रिकामा असल्याने सकाळी अकराची सभा एक वाजेपर्यंत सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे वैतागलेले र्शोते मंडप सोडून जाऊ लागले. रटाळ, लांबलेल्या भाषणांमुळे सभा निरुत्साही वातावरणात पार पडली. अकरा जणांची भाषणे झाली; परंतु एकदाही टाळ्या वाजल्या नाहीत.

आंबेडकर-आठवलेंवर टीका
गोडासाठी उष्टे खाण्याचा प्रकार रामदास आठवले यांनी केला. थोर पुरुषांचे स्वप्न मातीत गाडण्यासाठी सैतानांच्या टोळीत सामील व्हायला आठवलेंना लाज वाटली नाही. प्रकाश आंबेडकरांना ‘आंबेडकर’ नावाचा नुसताच वारसा लाभला. आठवलेंनी खुल्लमखुल्ला तडजोड केल्याची टीका कवाडेंनी केली.

मोदींना खुल्या चर्चेचे आव्हान
नरेंद्र मोदी यांना मी जाहीर आव्हान देतो. महाराष्ट्र आणि गुजरातच्या फक्त विकासाचीच आपण तुलना करू. मुंबई, अहमदाबाद किंवा तुम्ही म्हणाल तिथे. मी खात्रीने सांगू शकतो की, महाराष्ट्र सर्व बाबतींत गुजरातच्या पुढे आहे. नरेंद्र मोदी सगळीकडे ‘गुजरात मॉडेल’बद्दल बोलतात; पण हे मॉडेल काय, याबद्दल ते काहीच सांगत नाहीत. देशाचे परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, राममंदिर, 370 वे कलम यासारख्या अनेक मुद्दय़ांवर मोदी बोलतच नाहीत, असेही मुख्यमंत्री चव्हाण या वेळी बोलताना म्हणाले.

काँग्रेसची प्रगतीच : चव्हाण
‘केंद्र सरकारची कामगिरी चांगली नसल्याचा आभास विरोधी पक्षांनी मोठय़ा प्रमाणात निर्माण केला; परंतु देशाच्या इतिहासात यापूर्वी कधी नव्हे इतकी आर्थिक प्रगती काँग्रेस सरकारच्या कारकीर्दीत झाली. त्यामुळे कोणालाही काहीही बोलू द्या. कुणीही ही वस्तुस्थिती तपासावी,’ असे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.