आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांनाच चर्चेसाठी बोलावतात : शरद पवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मीडियात उलटसुलट काहीही येत असले तरी देशाचे पंतप्रधान महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आम्हा सगळ्यांनाच बोलावतात. विरोधकांना शत्रू म्हणून पाहायचे नाही, हा आदर्श यशवंतराव चव्हाण असोत की अटलबिहारी वाजपेयी, सर्वांनीच आमच्यापुढे ठेवला आहे. हे तारतम्य सगळ्यांनीच ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस संघर्ष तीव्र झाला आहे. यामुळे यापूर्वीच्या अधिवेशनांप्रमाणेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधीसुद्धा वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय अस्पृश्यता टाळण्यासंबंधी पवारांनी व्यक्त केलेले मत महत्वाचे मानले जात आहे. पवार म्हणाले, राजकारणात मतभेद असतात. परंतु, सभ्यता, सुसंस्कृतपणा काही असतो की नाही? संसदेत आम्ही जरुर भांडतो. राष्ट्राचा संबंध येतो त्या ठिकाणी मात्र राजकारण बाजूला ठेवावे लागते. राजकीय जीवनात यशवंतरावांचा आदर्श होताच, मात्र संख्याबळ असो किंवा नसो प्रश्नांची मांडणी कशी करायची याचा आदर्श जनसंघाच्या रामभाऊ म्हाळगी यांनी घालून दिल्याचे सांगून वैधानिक कामाचा आदर्श त्यांनी नव्या पिढीपुढे घालून दिल्याचे पवार म्हणाले.

पवारांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पुणे महापालिकेतर्फे त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते बोलत होते. देशाचे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, उल्हास पवार, रिपब्लीकन पक्षाचे रामदास आठवले आदी यावेळी उपस्थित होते. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी स्वागत केले. उपमहापौर आबा बागूल यांनी आभार मानले.

देशाच्या अनेक राज्यांमध्ये राजकीय असहिष्णुतेचे वातावरण आहे. मात्र पवारांसारख्या नेत्यांनी राजकीय विरोध वेगळा ठेवला. व्यक्तीगत शत्रुत्त्व कधी मानले नाही, असे जावडेकर म्हणाले. रामदास आठवले म्हणाले, माझे पवारसाहेबांशी अत्यंत चांगले संबंध होते. आता नरेंद्र मोदींसोबत आहेत. मोदी जोपर्यंत संविधानासोबत आहेत तोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे.

‘प्रतिभा’संपन्न पवार
वाजपेयींसारखा अभ्यासू, सुसंस्कृत वक्ता पाहिला नसल्याचे सांगून पवार म्हणाले, वाजपेयी प्रचारासाठी मुंबईत होते. तेव्हा तुम्ही पवारांवर टीका का करत नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते उत्तरले, पवार बहुत ‘प्रतिभा’संपन्न नेता हैं... पवार यांच्या सौभाग्यवतींचे नाव ‘प्रतिभा’ असल्याचा संदर्भ लक्षात येताच सभागृहात एकच हशा पिकला.