आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Bank, Hailstorm, Divya Marathi

कर्जमाफीचा निर्णय बँका घेतील; पवारांनी वाचला अडचणींचा पाढा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - संकटाचा धाडसाने सामना करा, आत्महत्या करू नका, कुटुंबीयांचा विचार करा, अशा शब्दांत शेतक-यांना भावनिक साद घालून आणि सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मदतीच्या मुद्द्यावर मात्र अडचणींचा पाढाच वाचला आहे. गारपिटीच्या संकटाला ‘राष्‍ट्रीय आपत्ती’ जाहीर केल्याने काय होणार, असा प्रश्न करून पवार यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मागणीवर मंगळवारी स्पष्टपणे असहमती दर्शवली. कर्जवाटप बँकांनी केले असल्याने कर्जमाफीचा निर्णय सरकार घेऊ शकत नाही. यावर बँकांनी निर्णय घ्यावा, असे सांगत कर्ज सवलत देण्याचा मुद्दा सरकारपुढे नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
रब्बी हंगाम हातचा गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भक्कम आर्थिक मदतीची त्यांना गरज आहे. तिजोरीत खडखडाट असल्याने राज्य सरकारने अजून मदत दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर पवार तरी ठोस कृती कार्यक्रम सांगतील, अशी अपेक्षा होती. परंतु वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवारांनी शेतक-यांनाच धीर धरण्याचा उपदेश केला.


मदत प्रशासनामार्फत, सरकारची भूमिका नाही
आज शेतक-यांना मदत मिळवून देण्याला प्राधान्य आहे. यात आचारसंहितेची अडचण आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बुधवारी होणा-या बैठकीत त्यावर निर्णय घेऊ. मदतीचे वाटप प्रशासनातर्फे होईल. यात सरकारची भूमिका नसेल, अशी ग्वाही आयोगाला दिली जाईल, असेही पवारांनी सांगितले.


उसाला फटका, पण
साखर महागणार नाही

राज्यात गारपिटीने एकूण 16 लाख हेक्टरचे नुकसान झाले. यामुळे ऊस उत्पादन 15 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. नव्या लागवडीच्या उसाचे नुकसान झाल्याने येत्या हंगामात साखर उत्पादन घटणार नाही. देशात मुबलक साखर साठा असल्याने साखरेच्या दरात वाढ होणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.


मराठवाड्यातील तिघांसह राज्यात चौघांची आत्महत्या
गारपिटीने हातची पिके गेल्याने नैराश्यातून मराठवाड्यातील आणखी तीन तसेच जळगाव जिल्ह्यातील एका शेतक-याने आत्महत्या केली. दरम्यान, कळंब तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) देवळाली येथे पेटवून घेतलेल्या राजेंद्र लोमटे या तरुण शेतक-याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.


भीमा सोपान गोडबोले (39, कळमनुरी, जि. हिंगोली), अनिल कुलकर्णी (54, आळणी, जि. उस्मानाबाद), दिगंबर गंगाधर राऊत (65, कौदर-नांदर, ता. पैठण) तसेच चरण पारमेश पवार (40, आर्वी, जि. जळगाव)
अशी आत्महत्या केलेल्या शेतक-यांची नावे आहेत. या शेतक-यांवर बँका तसेच खासगी सावकारांचे कर्ज होते.
व्याजाचा डोंगर आणि अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने पिके हातची गेल्याने नैराश्यातून त्यांनी जीवन संपवले.
लोमटे यांचा अखेर मृत्यू : कर्जबाजारीपणाला कंटाळून शुक्रवारी पहाटे जाळून घेतलेले देवळाली (ता.कळंब) येथील राजेंद्र लोमटे यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.


वृद्ध शेतक-याने घेतले विष
कौदर-नांदर (ता. पैठण) येथील दिगंबर गंगाधर राऊत (65) यांनी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. राऊत यांनी बँकेकडून दोन लाख 68 हजार रुपये कर्ज घेऊन शेतात डाळिंबाची लागवड आणि गहू, हरभरा आदी पिके लावली होती. मात्र, अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे हतबल झालेल्या राऊत यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.


मदतीचा निर्णय आज शक्य
अवकाळी पाऊस व गारपिटीने पिके उद्ध्वस्त झालेल्या राज्यांना मदत देण्याबाबत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिगटाची बुधवारी बैठक होत आहे. महाराष्‍ट्रासह काही राज्यांनी मदतीसाठी केंद्राला विनंती केली होती.