आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Cases Of 222 People Who Agitate Opposite Pawar

शरद पवारांविरोधात आंदोलन करणाऱ्या २२२ जणांवर गुन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - कृषिमूल शिक्षण संस्थेची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विद्या प्रतिष्ठानने लाटल्याचा आरोप करत या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष अनुक्रमे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या काऱ्हाटी (ता. बारामती) येथील २२२ आंदोलकांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काऱ्हाटी येथील प्रसिद्ध संस्था कृषिमूलचे अध्यक्ष अजित पवार व राष्ट्रवादीच्या संचालकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे ही जमीन विद्या प्रतिष्ठानला दिल्याचा या ग्रामस्थांचा आरोप आहे. त्याविरोधात कृषिमूल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद वाबळे, गावच्या सरपंच सुरेखा खंडाळे, महादेव खंडाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारण्यात आले आहे. रविवारी त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत पवारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या आंदोलनात सहभागी झालेल्या २२२ जणांवर वडगाव निंबाळकर पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बदनामी करू नका : पवार
गावकऱ्यांचे आंदोलन अधिकच तीव्र होत असल्याने सोमवारी अजित पवार यांनी काऱ्हाटी येथील ग्रामस्थांची भेट घेतली. या आंदोलनाच्या माध्यमातून आमची व संस्थेची नाहक बदनामी करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र कृषिमूल संस्थेची जमीन परत केल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिल्याने पवार आल्या पावली परत गेले.