आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांनी केले पुरुषोत्तम खेडेकरांचे कौतुक, ... तर संभाजी ब्रिगेड ‘भारतरत्न’ देणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘इतिहासाचा आधार घेऊन समाजातील वैमनस्य वाढवणारी विचारधारा अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. त्याला आपण बळी पडलो. म्हणून काय वाचावे याचे तारतम्य बाळगणारी वाचनसंस्कृती वाढवली पाहिजे. वास्तवतेचे भान ठेवून इतिहासाचे चित्रण यायला हवे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुण्यात व्यक्त केले. ‘पुरुषोत्तम खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सामाजिक चळवळ उभी करून वास्तव इतिहास नव्या पिढीपर्यंत नेला,’ असे पवार म्हणाले.

शिवमहोत्सव शिवसन्मान समितीतर्फे खेडेकर व मावळ्यांच्या वंशजांच्या हस्ते ‘पद्मविभूषण’ सन्मानाबद्दल पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते बोलत होते. पुरुषोत्तम खेडेकर अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे, पी. ए. इनामदार, प्रमोद मांडे, अॅड. मिलिंद पवार आदींचाही या वेळी सत्कार करण्यात आला.  

पवार म्हणाले, ‘विकृत विचारांची मांडणी करणारे काही घटक असतात. लहानसे उदाहरण देतो. काही जण ‘गांधीवध’ असा उल्लेख करतात. ‘वध’ कोणाचा होतो? दुष्ट प्रवृत्तींचा वध होतो. मात्र गांधींबद्दलचा आकस व्यक्त करण्यासाठी हत्येऐवजी ‘वध’ शब्द वापरला जातो. याच पद्धतीने शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आज तज्ज्ञ जी मांडणी करत आहेत ती वाचल्यानंतर खात्री पटते की ते विशिष्ट धर्माच्या विरोधात नव्हते. हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत सर्व जाती-जमातींनी योगदान दिले अाहे. छत्रपती शिवाजी महाराज हे विशिष्ट वर्गाच्या विरोधात असल्याची विद्वेषाची मांडणी काहींनी केली. खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक वाटते की त्यांनी वास्तव चित्र पुढे आणले,’ असे पवार म्हणाले.

‘एका शैक्षणिक संस्थेत माझ्या हस्ते सत्कार केले जात असताना माझ्याकरवी पुस्तके दिली जात होती. उत्सुकतेने मी कोणती पुस्तके आहेत हे सहज पाहिले तर त्यात गोळवलकर गुरुजींचे ‘बंच ऑफ थॉट्स’ निघाले. माझ्या हातून गोळवलकरांची पुस्तके?’ असा प्रश्न विचारून डाॅ. आंबेडकर, फुले, शाहू, सयाजीराव यांच्या जीवनचरित्राचा प्रसार झाला पाहिजे, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली. 
 
संभाजी ब्रिगेड ‘भारतरत्न’ देणार  
‘संभाजी ब्रिगेडचे राज्य येईल तेव्हा आम्ही शरद पवारांना ‘भारतरत्न’ देऊ. पवारांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी संभाजी ब्रिगेड पाठिंबा देईल. संभाजी ब्रिगेडचा राष्ट्रवादीला नेहमीच पाठिंबा मिळाल्याचे सांगितले जाते. पवारांनीही आमच्याकडे लक्ष ठेवावे अशी अपेक्षा आहे,’ असे पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...