आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंड महाराष्ट्र हीच राष्ट्रवादीची इच्छा; विदर्भाच्या जनतेचा कौल मान्य करू- शरद पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्र राज्य अखंड राहावे अशी राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे. मात्र महाराष्ट्रातच राहायचे की वेगळे व्हायचं याचा निर्णय तेथील जनताच करेल. एखादा पक्ष अथवा नेत्यांनी हा निर्णय घेऊ नये, अशी भूमिका पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे.
शरद पवार यांनी आज दुपारी 12 वाजता पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेला दस-यानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पवार बोलत होते. यावेळी पत्रकारांनी पवारांना अनेक मुद्यांवर बोलते केले. पवारांनीही पत्रकारांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिली.
पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करण्याचाच विचार करेल. या निवडणुकीत 100 टक्के यश मिळावे यासाठीच प्रयत्नशील आहे. आघाडी तुटल्याने पक्षाला क्रमांक एकचा पक्ष बनविणे हेच आपले उद्दिष्ट असेल. आघाडी करण्यास सोनिया गांधी सकारात्मक होत्या. मात्र, राज्यातील नेत्यांनी जागावाटपाची चर्चा दिल्लीहून मुंबईत आणली. त्यातच राज्य नेत्यांनी ताठर भूमिका घेतल्याने जागावाटपाची बोलणी यशस्वी झाली नाही. परिणामी आम्हाला स्वबळवर निवडणुकीस सामोरे जावे लागत आहे. असो तो विषय आता संपलेला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार नसावा म्हणून आमच्या उमेदवारांने अर्ज मागे घेतला. मात्र, पाठिंबा कुणाला द्यायचा हा निर्णय अद्याप घेतला नसून, स्थानिक पदाधिकारी त्याबाबत निर्णय घेतील, असेही पवारांनी यावेळी सांगितले.

वेगळ्या विदर्भाबाबत राष्ट्रवादीची भूमिका कायम संदिग्ध राहिली आहे. कधी ते छोट्या राज्याचे समर्थन करतात तर कधी स्वतंत्र विदर्भाला विरोध. राष्ट्रवादीने गुरुवारी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भाला विरोध करू असे म्हटले आहे. पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या वारंवार बदलणा-या भूमिकेविषयी छेडले असता पवार म्हणाले, महाराष्ट्र अखंड राहावा अशीच राष्ट्रवादीची इच्छा आहे. अखंड महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी प्राण गमावले. त्यामुळे महाराष्ट्राच्या एकतेला धक्का लागू नये अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र, हे एखाद्या पक्षाने, त्यांच्या नेत्यांनी म्हणून चालणार नाही. विदर्भातील जनतेला काय वाटते हे महत्त्वाचे आहे. कारण यापूर्वी जेव्हा-जेव्हा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा करुन निवडणूक लढवल्या गेल्या तेव्हा- तेव्हा ते-ते पक्ष, नेते यशस्वी झाले नसल्याकडे पवारांनी लक्ष्य वेधले.
स्वतंत्र विदर्भाच्या नावाने जनमत कौल घेतल्यास जनता ज्याच्या पारड्यात कौल देईल तो कौल राष्ट्रवादीला मान्य असेल. त्यामुळे राज्यातील नेते नव्हे तर विदर्भातील नागरिकच याबाबतचा अंतिम निर्णय घेतील असे पवारांनी सांगितले.
शिवसेनेला अलीकडे काही सल्ला देता का असे पत्रकारांनी छेडले असता पवार म्हणाले, अलीकडे मी असे काही करीत नाही. होय, बाळासाहेब होते तेव्हा आमच्यात चांगला संवाद असायचा. आम्ही सर्व विषयावर बोलायचो. पण आता उद्धव यांच्याशी ते होत नाही. उद्धव संपर्क साधत नाहीयेत आणि मलाही वेळ मिळत नाही. कदाचित हा जनरेशन गॅप असू शकतो, असे पवारांनी सांगितले.