आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar, Shinde Now Play As Actor In Maharathi Cinma

शरद पवार, शिंदे यांचा मराठी चित्रपटात प्रवेश, रामदास फुटाणे करणार निर्मिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ज्यांच्या राजकारणातील भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते ते शरद पवार व राजकीय पटलावर हसमुख ‘भूमिकां’मुळे चर्चेत असणारे सुशीलकुमार शिंदे ही गुरु-शिष्य जोडगोळी मराठी चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी एकत्र आली आहे. निर्माते-दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनी ही किमया घडवून आणली आहे.

फुटाणे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सरपंच भगीरथ’ चित्रपटात पवार आणि शिंदे ‘पाहुणे कलाकार’ म्हणून झळकले आहेत. विशेष म्हणजे रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच अवतरणा-या या दोन्ही नेत्यांनी चित्रपटातही नेत्याचीच भूमिका वठवली आहे.
डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांना पडद्यावर आणि पडद्यामागे विजय तेंडुलकर-डॉ. जब्बार पटेल या चार श्रेष्ठांना ‘सामना’ चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र आणून 1975 मध्ये फुटाणे यांनी इतिहास घडवला होता. राजकीय व्यवस्था आणि कृतिशून्य नैतिकतेवर प्रखर भाष्य करणा-या ‘सामना’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी तेव्हा काही पुढा-यांनी केली होती. ‘सरपंच भगीरथ’मध्ये फुटाणे यांनी आरक्षण व जातिव्यवस्थेचा गंभीर विषय हाताळला आहे.


वयाच्या सत्तरीत असलेल्या फुटाणे यांच्याशी असलेल्या स्नेहापोटी पवार आणि शिंदे यांनी ही भूमिका स्वीकारली. गेल्या नोव्हेंबरमध्ये मुहूर्त झालेल्या ‘सरपंच भगीरथ’चे चित्रीकरण आता पूर्ण झाले आहे. सध्या सेन्सॉर बोर्डाकडे असलेला हा चित्रपट दिवाळीपूर्वी मराठी रसिकांच्या भेटीला येईल, असे फुटाणे यांनी सांगितले. राष्‍ट्रीय पुरस्कारप्राप्त उपेंद्र लिमये आणि आघाडीची अभिनेत्री वीणा जामकर यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. परभणी येथील आसाराम लोमटे यांची कथा, तर ‘शिवाजी अंडरग्राऊड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकातून ताकद दाखवून दिलेले मराठवाड्यातील लोकशाहीर संभाजी भगत यांनी चित्रपटाला संगीतसाज चढवला आहे.


पवार-शिंदे यांचा ‘रोल’ काय?
प्रत्यक्ष राजकीय कारकीर्दीत सामाजिक न्यायाची भूमिका घेतलेल्या पवार आणि शिंदे यांचे ‘सरपंच भगिरथ’मधील संवाददेखील आरक्षणाचा पुरस्कार करणारे आहेत. चित्रपटात पवार-शिंदे यांच्या मुलाखतींचा भाग ‘सीन’ रूपाने दाखवलेला आहे. ‘आरक्षण हा कायमस्वरूपी उपाय नसला तरी आरक्षणाला धक्का लावण्याची वेळ आलेली नाही. मागासलेल्या जातींना न्याय देण्यासाठी आरक्षण अजूनही अनिवार्य आहे’, अशी आग्रही भूमिका या नेत्यांनी पडद्यावरही मांडली आहे. या चित्रिकरणासाठी दोन्ही नेत्यांनी खास वेळ काढला होता.