आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी, शास्त्रज्ञांमुळे दुसरी हरित क्रांती शक्य - शरद पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - काळ्या आईवर प्रेम करणारा शेतकरी आणि प्रयोगशाळेत संशोधन करणारे शास्त्रज्ञ यांच्यामुळे देशात दुसरी हरित क्रांती घडू शकली, असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अमेय प्रकाशन यांच्यावतीने ‘दुसरी हरित क्रांती’ या पुस्तकाचे प्रकाशन पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना केलेल्या निवडक भाषणाचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मायी अध्यक्षस्थानी होते. प्रतिष्ठानचे पुणे अध्यक्ष अंकुश काकडे, खासदार वंदना चव्हाण या वेळी उपस्थित होते. प्रकाशक उल्हास लाटकर यांनी प्रास्ताविक केले.
पवार म्हणाले, ‘सत्तरच्या दशकापर्यंत भारत अन्नधान्याचा आयातदार देश होता. पहिल्या हरित क्रांतीने देशाला स्वयंपूर्ण केले. त्यानंतर पुन्हा सन 2000 नंतर आयात करावी लागली. 50 दशलक्ष टन अन्नधान्य आयातीच्या निर्णयावर सही करताना माझा हात थरथरला होता. मात्र, त्यामुळे देशाच्या भुकेचा प्रश्न तात्पुरता सुटला.’

चीनच्या एकंदर शास्त्रज्ञाच्या संखेशी तुलना करता भारतातील शास्त्रज्ञाची संख्या फक्त 10 टक्के आहे. संशोधनाच्या क्षेत्रातील ही पीछेहाट परवडणारी नाही. पवार यांनी भारताला पुन्हा अन्नसमृद्धीच्या दिशेने नेले, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले. डॉ. मायी म्हणाले, की पवार यांची दहा वर्षांची कृषीमंत्रीपदाची कारकीर्द अविस्मणीय कृषी इतिहासाचा भाग आहे. हाडाचे शेतकरी असलेल्या पवार यांच्याच काळात कृषी उत्पादनवाढीचा दर 1.8 वरून 3.5 टक्क्यांवर गेला. अन्न धान्याचे उत्पादन 210 दशलक्ष टनावरून 260 दशलक्ष टनावर नेले. शेतमालाच्या आधारभूत किमती शरद पवारांनी 40 ते 120 टक्क्यांनी वाढवल्याचे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.