आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांची \'एन्ट्री\' अन् सुरेखा पुणेकरांची \'दिसला गं बाई दिसला\' लावणी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा दहावा राम कदम पुरस्कार प्रसिद्ध गीतकार, संगीतकार यशवंत देव यांना रविवारी सायंकाळी बालगंधर्वमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात मात्र दस्तुरखुद्द शरद पवारांनीच रंग भरले. त्यावर अध्यक्षस्थानी असलेल्या जब्बार पटेलांनी हास्यांची कारंज्या उडवल्या.
बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार समारंभाच्या अगोदर राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या लावण्यांचे सादरीकरण आणि गीतांचा बहारदार कार्यक्रम सुरु होता. मान्यवर पाहुणे येईपर्यंत रसिक प्रेक्षकांचा वेळ जावा म्हणून या संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लावण्याचे सादरीकरण सुरू असतानाच पवारांसह मान्यवरांचे सभागृहात आगमन झाले. त्याच वेळी सुरेखा पुणेकर यांनी 'दिसला गं बाई दिसला' या लावणीवर ठेका धरला. त्या पाठोपाठ 'पिकल्या पानाचा' ही लावणी गायली. त्यानंतर कार्यक्रम सुरु झाला. पवार जेव्हा बोलायला लागले तेव्हा त्यावर त्यांनी कोटी केली. पवार म्हणाले, लावणी सादर करणार्‍या सुरेखाबाई माझ्याकडे नजर रोखून ‘दिसला गं बाई दिसला’ म्हणत होत्या, पण बाई मी आता 75 वर्षांचा झालो आहे. बाई तुम्हाला मी भलत्याच वेळी दिसलो अशी मिष्कील अन् खट्याळ टिप्पणी केली. त्यावेळी संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. खुद्द पवारही मनापासून खळखळून हसले.
शरद पवार यांनी लावणीला दिलेली दाद, त्याचे जबरदस्त असे स्मितहास्य नेमके कशासाठी हेच कोणाला कळत नाही असा सवाल पवारांच्या उपस्थितीत अध्यक्षस्थानी असलेल्या जब्बार पटेलांनी विचारला. जब्बार म्हणाले, पवार यांचा कोणालाच अंदाज येत नाही. त्यांनी असे का वक्तव्य केले हे पण कळत नाही. त्यांचे स्मितहास्य कशासाठी हे कोणाला कळले आहे का, असे अनेक प्रश्‍न करत पवार यांनाच हास्याच्या प्रवाहात आणले.
एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मागील महिन्यातच हा पुरस्कार देव यांना देण्यात येणार होता. पण माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे निधन झाल्यामुळे कार्यक्रम होऊ शकला नव्हता. यामुळे हा कार्यक्रम रविवारी पार पडला.