आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका टाळण्यासाठी उत्तराखंडमधील दुर्घटनाग्रस्त नातेवाइकांची शरद पवारांकडून चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - उत्तराखंड प्रलयात बेपत्ता झालेल्या महाराष्‍ट्रीय यात्रेकरूंच्या नातेवाइकांची भेट अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी टाळल्याची चर्चा सोमवारी पुण्यात दुपारी सुरू झाली. यातून निर्माण झालेल्या गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी शरद पवार यांनी दिल्लीतून लक्ष घातले आणि वेळीच ‘डॅमेज कंट्रोल’ केले. त्यामुळे पवार कुटुंबीयांच्या प्रतिमेवर अनास्थेचा शिक्का बसण्याचा प्रसंग टळला.


उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी सर्किट हाऊसवर उपस्थित होते. बेपत्ता यात्रेकरूंचे पंधरा-वीस नातेवाईक उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तेथे गेले. बैठक संपल्यानंतर सुळे आणि अजित पवार लगबगीत निघून गेले.


त्यानंतर ‘उत्तराखंड दुर्घटनेतील नातेवाइकांना अजित पवार-सुळेंनी भेट नाकारली’ अशा बातम्या लागलीच वृत्तवाहिन्यांवर सुरू झाल्या. त्या वेळी दुस-या एका बैठकीनिमित्त अजित पवार साखर संकुलात होते. त्यांनी भेटीसाठी आलेल्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्यांना साखर संकुलात बोलावून घेतले. ‘तुम्ही भेटीसाठी आल्याचा निरोप मला मिळाला नाही. त्यामुळे मी निघून आलो. कृपया गैरसमज नसावा,’ अशी समजूत काढत त्यांनी या नातेवाइकांशी चर्चा केली. घरी पोहोचलेल्या सुळेंनीही साखर संकुलात धाव घेत दिलगिरी व्यक्त करून त्यांचे म्हणणे ऐकले.


पवारांची तत्परता
दिल्लीतून शरद पवारांनी त्वरेने अजित पवारांच्या फोनवर बेपत्ता यात्रेकरूंच्या पुण्यातील नातेवाइकांशी संपर्क साधला. केंद्र सरकार आणि सैन्याच्या मदतीने मराठी बेपत्ता लोकांच्या शोधासाठी आणखी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अजित पवारांनीही उत्तराखंडमध्ये असलेल्या सुरेश धस यांच्याशी संपर्क साधून त्यांना सूचना केल्या.