आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगली बॉलरच्या मुलीशी लग्न केले की विकेट जातेच, शरद पवारांची दिलखूलास उत्‍तरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पत्नीच्या साड्या खरेदीपासून ते आवडत्या गायक-गायिकेपर्यंत आणि इंग्लंडच्या पंतप्रधानांपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंतचे विविध दाखले देत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिलेल्या दिलखुलास उत्तरांमुळे साेमवारी पुणेकरांना या ज्येष्ठ नेत्याची मिश्किली अनुभवण्यास मिळाली. निमित्त होते शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या राम कदम कलागौरव पुरस्काराचे...    
 
या कार्यक्रमात प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना यंदाच्या ‘राम कदम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये आणि मानचिन्ह या स्वरूपाचा पुरस्कार प्रतिभाताई शरद पवार यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ  संगीतकार प्रभाकर जोग, इनॉक डॅनियल आदी उपस्थित होते.  संसदीय कारकीर्दीप्रमाणेच विवाहासदेखील पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पवार दांपत्याचा या वेळी सत्कार करण्यात आला. यानंतर सुधीर गाडगीळ यांनी पवार दांपत्य व अनुराधा पौडवाल यांच्याशी एकत्रितपणे संवाद साधला.  

 ‘जुन्या माणसांची नावं तुमच्या लक्षात कशी राहतात?’ या प्रश्नावर पवार उत्तरले, ‘सार्वजनिक क्षेत्रात असल्यामुळे सर्वांच्याच अपेक्षा असतात. त्या पूर्ण करणे शक्य नाही. पण एकदा एखाद्याला भेटल्यानंतर त्या माणसाचं नाव माझ्या (डोक्याच्या) कॉम्प्युटरमध्ये मी साठवून ठेवत असतो. भेटलेल्या माणसाचे नाव घेतल्याने त्याला सुखावह आनंद मिळत असतो. त्यामुळे मी ती काळजी घेतो.’ ‘पवारांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला तरी कळतं का?’  हा प्रश्न पूर्ण होण्याच्या आधीच प्रतिभाताईंनी ‘नाही’ असे उत्तर दिले तेव्हा जोरदार हशा पिकला. त्यावर ‘गुगली बॉलरच्या मुलीशी लग्न केले की विकेट जातेच...’  पवारांच्या या प्रत्युत्तराने आणखी हशा पिकला.   
 
‘आवडते गायक-गायिका कोण?’  असा प्रश्न आल्यावर पवार म्हणाले, ‘अनुराधाताईंना कदाचित आवडणार नाही, पण माझी आवडती गायिका किशोरी (आमोणकर) आहे. आणि गायक अर्थातच भीमसेन (जोशी).’ यावर पौडवाल यांनीही आमोणकर या त्यांच्याही आवडत्या गायिका असल्याचे सांगितले.    

‘शरदराव तुमच्यासाेबत एकदा तरी साड्या घेण्यासाठी आले का?’, असा प्रश्न प्रतिभाताईंना विचारला असता त्यांनी उत्तर देण्याआधीच पवार म्हणाले, ‘माझ्या बायकोने नेसलेली प्रत्येक साडी मी स्वतः खरेदी केलेली आहे. जाईन तिथून तिला साड्या घेऊन येतो. मग आठवड्याचे सात दिवस फिरायला मी मोकळा असतो’, त्यावर सभागृहात जोरदार हशा पिकला. वाचनाच्या आवडीबद्दलही पवार बोलले. ‘आत्मचरित्र, चरित्र वाचण्यात जास्त गंमत असते. यातून संबंधित व्यक्ती जाणून घेता येते. हल्ली मी इंग्रजी जास्त वाचतो.’   
 
यशवंतराव- विल्सन यांची मैत्री   
‘लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे चालताबोलता ज्ञानकोश. कोणत्याही गोष्टीवर ते मार्गदर्शन करू शकत. गोविंदराव तळवलकरांचे वाचन अफाट. जगातले इंग्रजी पुस्तक त्यांनी वाचले नाही, असे सहसा होत नसे. त्याबाबतीत त्यांच्या जवळ जाणारे एकच ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. या सगळ्या मंडळींना एकच व्यसन ते म्हणजे वाचन. एकदा मी लंडनच्या लायब्ररीत गेलो होतो. तिथे एक जण वाचत बसले होते. त्यांना पाहून मला वाटले की, आपण यांना कुठे तरी पाहिलंय. मी चौकशी केल्यावर समजले की, ते इंग्लंडचे माजी पंतप्रधान विल्सन होते. त्यांना मी कधी भेटलो नव्हतो; पण बातम्यांमधून नाव ऐकले होते. पेपरमध्ये फोटो पाहिले होते. मी त्यांच्याशी ओळख करून घेतली. मी भारतातून, महाराष्ट्रातून आलोय, असे म्हटल्यावर त्यांनी प्रश्न केला, ‘हाऊ इज माय फ्रेंड वाय. बी. चव्हाण?’  वाचनप्रेमामुळे चव्हाण आणि विल्सन यांची मैत्री जुळली होती,’ असे पवार यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...