आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री खडसेंची चाैकशी सरकारच्या मूडवर अवलंबून : शरद पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - "माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या चौकशीसाठी कोणाला नेमायचे हे आधीच ठरवले असेल. ज्यांची नेमणूक करायची त्यांच्याशीही चर्चा झाली असणार. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी चौकशी होण्याआधीच त्यांना क्लीन चिट दिली. सरकारच्या मूडवर ही चौकशी अवलंबून आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर केली.

साखर कामगारांच्या मागण्यांसंदर्भात बैठकीसाठी पवार मंगळवारी पुण्यात आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. खडसे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ‘क्लीन चिट’वर पवारांनी आक्षेप घेतला. चौकशी समितीच्या अहवालाबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. ‘चौकशीसाठी समिती कोणाची नेमायची हे सरकारने अगोदरच ठरवलेले दिसते. चौकशीनंतरच्या अहवालाबाबतही चर्चा झाली असेल,’ असा टाेलाही त्यांनी लगावला. आघाडी सरकारच्या काळात वाटप झालेल्या सरकारी भूखंडांची श्वेतपत्रिका सरकारने जरूर काढावी. मुख्यमंत्र्यांकडे तेवढा वेळ असेल तर चौकशीही करावी, असा चिमटाही त्यांनी काढला. ‘आम्ही संस्थांनाच भूखंड दिले आहेत. शासनाने खासगी व्यक्तींना किती जागा दिल्या हे मला सांगताही येणार नाही. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे वेळ असेल तर त्यांनी करायच्या तेवढया चौकशा कराव्यात,’ असा सल्लाही पवारांनी दिला.

सध्याचे देशाभोवतीचे चित्र पाहता संरक्षण खात्यासाठी शंभर टक्के परदेशी गुंतवणुकीस परवानगीचा निर्णय चिंताजनक असल्याचे मत माजी संरक्षणमंत्री असलेल्या पवारांनी व्यक्त केले. संरक्षण आणि नागरी विमान वाहतूक क्षेत्रात शंभर टक्के गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या केंद्राच्या निर्णयावर पवार यांनी गंभीर आक्षेप नोंदवले. ते म्हणाले, ‘परदेशी गुंतवणुकीमुळे देशाचा फायदाच होतो. मात्र, संरक्षण, नागरी विमान वाहतूक क्षेत्रात शंभर टक्के परदेशी गुंतवणुकीस परवानगी देणे चुकीचे आहे. यामुळे रोजगार वाढेल, कारखानदारी वाढेल. मात्र, सभोवतालचे देश या निर्णयाचा गैरफायदा घेण्याची भीती आहे. संरक्षण क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीमुळे देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होईल. हे लक्षात घेऊनच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ४० ते ५० टक्क्यांपर्यंतच विदेशी गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. विमान वाहतुकीतही हीच स्थिती आहे. एखादी बडी कंपनी बाहेरून आल्यास तिची मक्तेदारी निर्माण होईल. त्याचा फटका देशातील विमान प्रवाशांना बसणार आहे. आता सरकारचे हे दोन्ही निर्णय आश्चर्यकारक आहेत. आघाडी सरकारने विदेशी गुंतवणूक वाढविण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी भाजपसंबधित स्वदेशी जागरण मंच आणि भारतीय मजदूर संघाने टोकाची भूमिका घेत मनमोहन सिंग यांना विरोध केला होता. आता या संघटना काय करताहेत हे आम्ही बघू,’ असा टोमणाही पवारांनी मारला.

‘सनातन बंदी’बाबत मात्र पवारांचे माैन
- रिझर्व्ह बँक गव्हर्नर पदाची यापूर्वी कधी इतकी चर्चा झाली नव्हती. रघुराम राजन यांच्याबाबत चर्चेने चुकीचा संदेश जात आहे. त्यांना घालविण्यासाठी भाजपच्या खासदारांनी टीका केली. राजन पुन्हा दुसरी टर्म स्वीकारणार नाहीत असे वातावरण तयार केले.

- डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयसारखी संस्था खोलात जाऊन तपास करत आहे. त्यातून काही गंभीर बाबी समोर येत आहेत. या प्रकरणाचे सत्यचित्र समोर यायला हवे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबत मात्र पवार यांनी मौन बाळगले.

काँग्रेसशी आघाडी होणार
"भाजप-शिवसेना एकमेकांवर हल्ले चढवत असले तरी हे दोन्ही पक्ष सत्ता सोडणार नाहीत. मुख्यमंत्र्यांची शिवसेनेबाबत असलेली भाषा पाहता त्यांची युती अबाधित राहील, असे वाटते,’ असे सांगतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत सहमती असल्याचेही पवार म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...