पुणे - ‘डाॅ. नरेंद्र दाभाेलकर, गाेविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे माैन का अाहे?’ असा सवाल करतानाच ‘त्यांनी बाेलले पाहिजे,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी शनिवारी व्यक्त केली. दाभाेलकर व पानसरे यांचे मारेकरी शाेधण्यात अपयशी ठरलेली यंत्रणा व सरकारच्या निषेधार्थ अंनिसचे सरचिटणीस डाॅ. हमीद दाभाेलकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी पुण्यात अांदाेलन करण्यात अाले. या वेळी अाढाव म्हणाले, ‘पवारांनी अातापर्यंत अनेक मुलाखती दिल्या. सरकार त्यांच्या सल्ल्याप्रमाणे चालते असा प्रचारसुद्धा अाहे. मात्र, अातापर्यंत पवारांनी दाभाेलकर-पानसरेंच्या खुनाबद्दल एकही शब्द काढलेला नाही. या खुनाला वाचा फुटली पाहिजे त्याकरिता प्राधान्याने या विषयाकडे पाहिले पाहिजे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे तर महाराष्ट्रात भाजप सरकार अाहे. सनातनसारख्या संस्थांना या सरकारचा छुपा पाठिंबा असल्याने सत्य उघड हाेत नाही. राज्यकर्त्यांची भूमिका दुटप्पी असल्याने संघर्ष करावा लागत अाहेे.’
डाॅ. हमीद म्हणाले, ‘सीबीअाय व एसअायटी या यंत्रणांमध्ये समन्वय हवा. सरकारने वेळीच लक्ष दिले असते तर पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या नसत्या. संशयित संस्थेशी काेणाचे लागेबांधे अाहेत? त्यांच्या एका साधकावर चार्जशीट दाखल हाेऊनही संस्थेवर कारवाई का हाेत नाही?’ असे सवालही त्यांनी उपस्थित केले.