बारामती - का-हाटी (ता. बारामती) येथील कृषिमूल उद्योग संस्थेची ७३ एकर जमीन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानने लाटली असल्याचा आरोप का-हाटीच्या ग्रामस्थांनी शनिवारी ग्रामसभेत केला. संस्थेच्या उपाध्यक्षांनीही जमीन हस्तांतरणाच्या प्रक्रियेला विरोध केला असून याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
कृषिमूल संस्थेचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. या संस्थेच्या संचालक मंडळाने
आपली संस्था विद्या प्रतिष्ठानशी जोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मूळ शिक्षण संस्था, त्यातील कर्मचारी यांना समाविष्ट न करता विद्या प्रतिष्ठानने कृषिमूल संस्थेच्या मालकीची ७३ एकर जमीन हस्तांतरीत करून घेतले. त्याला आमचा विरोध असल्याचे ग्रामस्थांनी ग्रामसभेत सांगितले. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील गायरान सरकारी जमीन घेतल्याची तक्रार यापूर्वीच विद्या प्रतिष्ठानविरोधात दाखल आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच आणखी एक आरोप झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.
शेतक-यांच्या मुलांसाठी रत्नागिरी येथील डॉ. अच्युतराव पटवर्धन यांनी १९५२ मध्ये ही संस्था उभारली. पुढे माजी विद्यार्थ्यांनीच ही संस्था चालवावी असा त्यांचा मानस होता; परंतु कालांतराने काही व्यापारी मंडळींनी या संस्थेत शिरकाव केला. काही ज्येष्ठ समाजसेवकही पदाधिकारी आहेत, मात्र ते फारसे लक्ष देत नाहीत. आता राष्ट्रवादीचेच वर्चस्व असलेल्या या संस्थेची जमीन लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विश्वास चांदगुडे यांनी ग्रामसभेत केला.
काय आहे प्रकरण?
कृषिमूल शिक्षण संस्था हे शेतीशास्त्राचे शिक्षण देते. या संस्थेच्या मालकीची ७३ एकर जमीन आहे. या जमिनीच्या उत्पन्नावर विद्यार्थी वसतिगृहाचा खर्च भागवला जाताे. ही संस्था, कर्मचारी व इमारत, जमिनीसह विद्या प्रतिष्ठानशी जाेडण्याचा निर्णय संस्थेच्या संचालकांनी घेतला होता. मात्र संस्थेच्या जमिनीचे हस्तांतरण बेकायदा असल्याचे अपील ग्रामस्थांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे केले होते. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, हा विरोध डावलून विद्या प्रतिष्ठानने संस्था विलीन न करून घेता केवळ तिची जमीनच ताब्यात घेतल्याचाही ग्रामस्थांचा आरोप आहे.
हस्तांतराची प्रक्रिया सुरू, सचिवांचा दावा
न्यायालयात जाणार
संस्थेचा विकास होईल या उद्देशाने विद्या प्रतिष्ठानला कृषिमूल संस्था जोडण्याचा निर्णय संचालकांनी घेतला होता. मात्र, विद्या प्रतिष्ठानने केवळ शासनाने संस्थेला दिलेली जमीनच ताब्यात घेतली. काही जणांनी दबावाला बळी पडून ही प्रक्रिया पार पडली. इमारत, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांना मात्र वाऱ्यावर सोडून दिले. याविरुद्ध न्यायालयात दाद मागणार आहोत. अरविंद वाबळे, उपाध्यक्ष, कृषिमूल संस्था
ग्रामसभेला अधिकार नाही
महसूल खाते जमिनीचे हस्तांतरण करते. शाळा व शिक्षक हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामसभा या शिक्षण संस्थेचे भवितव्य ठरवू शकत नाही. का-हाटी ग्रामस्थांच्या आक्षेपावर संस्थेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अजित पवार निर्णय घेतील.
अॅड. भगवान खारतोडे, सचिव, कृषिमूल उद्योग शिक्षण संस्था
अजित पवारच सर्व सांगतील
का-हाटी येथील संस्था हस्तांतरणाच्या बाबतीत स्वत: संस्थेचे अध्यक्ष अजित पवार हेच विधानसभेच्या अधिवेशनानंतर स्पष्टीकरण देतील.
रमणिक मोता, संचालक विद्या प्रतिष्ठान