आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sheaphard Community Agitation News In Marathi, Chief Minister, Divya Marathi

धनगर समाजाचे आंदोलन पेटले, बारामतीत दगडफेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतरही तोडगा न निघाल्याने धनगर समाज कृती समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सरकार दोन समाजात भांडणे लावण्याचे उद्योग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, रविवारी सकाळी काही संतप्त आंदोलकांनी बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करून संतापाला वाट करून दिली.

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी आठ दिवसांपासून बारामतीत आंदोलन सुरू आहे. शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. रविवारी सकाळपासूनच आंदोलकांनी बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. काही दुकानांवर दगडफेकही करण्यात आली. दरम्यान, सोळापैकी पाच उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तोडफोडप्रकरणी पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतले आहे.

मंत्री मधुकर पिचडांचा दाखला बनावट : गावडे
धनगर आरक्षणाला विरोध करणारे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्याविरोधातही आंदोलकांत प्रचंड राग आहे. कृती समितीचे सदस्य बाळासाहेब गावडे म्हणाले, पिचड हे कोळी समाजाचे असताना महादेव कोळी असल्याचा बनावट दाखला त्यांनी मिळवला आहे. त्याचे पुरावे कृती समितीच्या हाती लागले आहेत. त्याविरोधात सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.