आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shetty Rejected Sharad Pawar And Ajit Apeal For The Support

पाठिंबा मागणारे शरद पवार खोटारडे ठरले,राजू शेट्टींचा खळबळजनक खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - लोकांनी जमवलेल्या पैशातून 2004 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पहिल्यांदा आमदार झाले. त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राष्‍ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांनी विनवण्या केल्या, पण शेट्टी यांनी त्या धुडकावून लावल्या. शेट्टींसारख्या सामान्य माणसाने आपली विनंती अव्हेरली याचा राग पवारांच्या मनातून गेला नाही. पण याच प्रकरणात अखेरीस शरद पवार कसे खोटे ठरले, यासारखे पडद्यामागचे अनेक किस्से राजू शेट्टी यांनी आपल्या ‘शिवार ते संसद’ या पुस्तकातून लोकांपुढे आणले आहेत.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कोल्हापूरचा राजू शेट्टी नावाचा तरुण शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचा खंदा कार्यकर्ता होतो. जीवघेणे हल्ले पचवत प्रस्थापितांविरुद्ध लढे उभारतो. लोकांचे अपार प्रेम जिंकत एकापाठोपाठ जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुका सहज जिंकत जातो. गरीब कुटुंबातून आलेला कार्यकर्ता ‘रिझल्ट’ देणा-या शेतकरी आंदोलनांमुळे देशभर परिचित होतो... हा सगळा सामाजिक-राजकीय प्रवास शेट्टी यांनी आपल्या पुस्तकात मोकळेपणाने शब्दबद्ध केलाय. ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या हस्ते सोमवारी या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. शेतकरी संघटनेतले दिवस, पवार काका-पुतण्याबरोबरचे राजकीय संघर्ष, शेतक-यांच्या प्रश्नांवरची विविध आंदोलने आदींची सविस्तर माहिती शेट्टी यांनी या पुस्तकात नमूद केली आहे. आजवर गुपित राहिलेल्या पडद्यामागच्या अनेक घडामोडी या पुस्तकातून उघड झाल्या आहेत. 2004 च्या विधानसभेनंतरचे एक गुपितही शेट्टी यांनी फोडले आहे. अजित पवार यांनी शेट्टींकडे पाठिंब्याची मागणी केली. मात्र, शेतक-यांच्या मागण्या मान्य करण्यास असमर्थता दर्शवल्याने शेट्टी यांनी काँग्रेस आघाडी सरकारला बिनशर्त पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यानंतर शरद पवारांच्या फोनलाही शेट्टींनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे पवार यांनी शेट्टींना खोटे पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो त्यांच्याच अंगलट आल्याचे शेट्टी यांनी पुस्तकात लिहिले आहे.
असे खोटे पडले पवार
‘पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून पुढे बरेच वादंग झाला. पवारसाहेब ब-याच वेळा कोल्हापूरला आले आणि मी फोन केलेला नसताना राजू शेट्टी सवंग लोकप्रियतेसाठी मी फोन केला होता, असं सांगत फिरतात, असं जाहीर वक्तव्य त्यांनी केलं. त्यावर मी पुन्हा सांगितलं की, कृषी भवनातून आॅक्टोबर महिन्यात जयसिंगपूरला किती एसटीडी कॉल झाले याची चौकशी करा. त्यानंतर मात्र ती चर्चा थांबली,’ असे शेट्टी यांनी पुस्तकात नमूद केले आहे.
पवारांचा फोन ठेवून दिला
जयसिंगपुरात असताना मला दिल्लीहून पवारांचा फोन आला. त्यांनीही पाठिंबा देण्याची विनंती मला केली. मी त्यांनाही तेच सांगितलं. त्यावर ते म्हणाले, ‘मी अटी घालून कुणाचा पाठिंबा घेत नाही.’ मी म्हणालो, पाठिंब्यासाठी तुम्ही मला फोन केला आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की, अटी घातल्याशिवाय मी कुणालाही पाठिंबा देणार नाही. लोकांनी मला वर्गणी काढून निवडून दिलं आहे. एवढं सांगून मी फोन ठेवून दिला. आपला फोन ठेवणाराही कोणी तरी आहे आणि शेतक-यांच्या मनात किती खदखद आहे, हे त्यांना कळावं. एवढ्यासाठीच हे केले. यात उद्धटपणा नव्हे, तर बाणेदारपणा होता.’
राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना.