आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरूर, मावळसाठी ‘राष्ट्रवादी’ची प्रतिष्ठा पणाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे जिल्ह्यात गेल्या वेळी गमवाव्या लागलेल्या लोकसभेच्या दोन जागा यंदा शिवसेनेकडून खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ताकद पणाला लावली आहे. पुण्यातल्या या दोन्ही जागा जिंकण्याचा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा केला असून ‘राष्ट्रवादी’च्या गटा-तटांना एकत्र आणण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे.
शिरूर मतदारसंघात 2009 मध्ये शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांचा पराभव करून ‘राष्ट्रवादी’ला जबरदस्त हादरा दिला होता. याही वेळी शिवसेनेकडून पाटील यांचे तिकीट पक्के आहे. त्यांच्याविरोधात ‘राष्ट्रवादी’ने भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम यांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. निकम हे ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत, तर चिंचवडचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांना ‘राष्ट्रवादी’ने मावळातून उमेदवारी देऊ केलीय. गेल्या वेळी शिरूर आणि मावळ या दोन्ही जागा शिवसेनेने जिंकल्यामुळे शरद पवार यांचे दिल्लीतले स्थान मजबूत करण्याच्या ‘राष्ट्रवादी’च्या प्रयत्नांना घरच्या जिल्ह्यातच सुरुंग लागला होता. संपूर्ण पुणे जिल्ह्यावर गेली पंधरा वर्षे वर्चस्व ठेवून असलेल्या अजित पवारांना हे दोन्ही पराभव जिव्हारी लागले. गेल्या पाच वर्षांत त्यांनी याचा उल्लेख वारंवार केला. मात्र, याही वेळी पक्षातल्या दुफळ्यांमुळे आव्हान अवघड असल्याचे ‘राष्ट्रवादी’चे वरिष्ठ नेते खासगीत सांगत आहेत.
शिवाजीराव आढळरावांविरोधात देवदत्त निकम नवखे उमेदवार
शिरूरमधून आढळरावांविरोधात लढण्याचा धोका पत्करण्यासाठी या वेळी ‘राष्ट्रवादी’तून कोणी समोर यायला तयार नव्हते. त्यामुळे आढळराव यांनाच पुन्हा ‘राष्ट्रवादी’च्या गोटात आणण्याचेही प्रयत्न झाले. मात्र, हे गणितही जुळले नाही. दिलीप वळसे पाटील, वल्लभ बेनके या ज्येष्ठांना रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी करून पाहिला; परंतु या दोघांनीही दाद न दिल्याने निकम यांच्यासारखा तुलनेने नवखा उमेदवार आढळराव यांच्या विरोधात उतरवण्याची पाळी ‘राष्ट्रवादी’वर आली आहे. निकम यांना निवडून आणण्याची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्यावर टाकण्यात आल्याचे समजते.
मावळात तीव्र संघर्ष
पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी आणि घाटावरचा रायगड जिल्ह्याचा भाग एकत्र येऊन झालेल्या मावळ मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’ आणि महायुतीची ताकद समान आहे. येथील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस आघाडीचे आमदार आहेत. शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी ‘राष्ट्रवादी’च्या आझम पानसरे यांचा गेल्या वेळी 80 हजार 619 मतांनी पराभव केला होता. या वेळी ‘राष्ट्रवादी’ने आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडून विद्यमान खासदार बाबर यांच्याऐवजी र्शीरंग बारणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे; परंतु जगताप यांना आझम पानसरे यांच्या नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.